वाहतूक कोंडीचा रुग्णावाहिकांना फटका; प्रवासी त्रस्त

सेंट्रल एव्हेन्यूवरील रेल्वेस्थानक परिसरात नागपूर मेट्रोसह रामझुलाचे काम सुरू आहे. गजबजलेल्या या मार्गावर वाहतुकीचे नियोजन नसल्याने वाहनांचा वेग मंदावून दररोजअनेक तास वाहतुकीची कोंडी होत आहे. त्यामुळे मेयोसह विविध खासगी रुग्णालयांत जाणाऱ्या रुग्णवाहिकाही कोंडीत अडकत असल्याने त्यातील रुग्णांना मोठा फटका बसत आहे. प्रवाशांना रेल्वे गाडय़ा पकडण्याकरिता धावाधाव करावी लागत आहे.

शहरातील जुन्या आणि नव्या वस्त्यांना जोडणारा महत्त्वाचा मार्ग म्हणून सेंट्रल एव्हेन्यूकडे बघितले जाते. शहरातील अनेक महत्त्वाच्या शासकीय कार्यालयांसह जिल्हा न्यायालय व नागपूर रेल्वे स्थानकावर बहुतांश नागरिकांना याच मार्गाने यावे लागते. शहरातील सर्वात जुने इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय (मेयो) या मार्गावर आहे. शहरातील सर्वाधिक गजबजलेल्या रस्त्यांपैकी हा एक असल्याने येथे वाहतुकीची कोंडी होऊ नये म्हणून शहर वाहतूक पोलीस, प्रादेशिक परिवहन विभाग आणि कंत्राटदारांनी संयुक्तरीत्या काम करण्याची गरज आहे. सेंट्रल एव्हेन्यूवरील रेल्वेस्थानकाच्या शेजारी होणारी वाहतूक कोंडी बघता याकडे सगळ्यांचेच दुर्लक्ष होत आहे. रेल्वेस्थानकाच्या शेजारी गेल्या अनेक वर्षांपासून रामझुल्याचे काम सुरू आहे. त्यातील एक मार्ग सुरू झाला, दुसऱ्याचे काम प्रगतीपथावर आहे. सोबत या प्रकल्पाच्या शेजारी नागपूर मेट्रोच्या कामाची भर पडली आहे. एकाच मार्गावर दोन वेगवेगळी कामे सुरू असल्याने येथे सर्वसामान्यांना वाहतूक कोंडीचा त्रास होऊ नये म्हणून काळजी घेण्याची जबाबदारी वाहतूक पोलिसांसह संबंधित कंत्राटदारांची असतानाही त्यांचे दुर्लक्ष होत आहे. त्यातच मध्य रेल्वे नागपूर मंडळासह दक्षिण पूर्व मध्य रेल्वे नागपूर मंडळ कार्यालयाचे सेंट्रल एव्हेन्यूवरील प्रवेशद्वारही वाहतूक कोंडीला जबाबदार ठरत आहे.

या कार्यालयाच्या वेळेला येथे अचानक हजारो कामगारांची रेलचेल वाढत असल्याने वाहतूक विस्कळीत होते. त्यामुळे मेयोसह विविध रुग्णालयांत जाणाऱ्या रुग्णवाहिका, शाळकरी मुले, रेल्वेस्थानकावर येणारे प्रवासीही अडकून पडतात. रेल्वे गाडी सुटण्याचा धोका बघता बरेचजण विविध खासगी वाहने किंवा ऑटोरिक्षाने येऊन सामानासह  रेल्वेस्थानकाच्या दिशेने धावतात. मध्य रेल्वे नागपूर मंडळासह दक्षिण पूर्व मध्य रेल्वे नागपूर मंडळ कार्यालयातून निघणारे कर्मचारी विरूद्ध दिशेने असलेल्या रस्त्यावर जाण्याकरिता वाहनासह पुढे येत असल्याने वाहतूक कोंडीत भर पडते. हा सगळा प्रकार वाहतूक पोलिसांना दिसत असतानाही त्याकडे दुर्लक्ष होत आहे. संत्रा मार्केटच्या दिशेवरील रेल्वेस्थानकाच्या प्रवेशद्वारावरही नागपूर मेट्रोचे काम सुरू असल्याने तेथेही मोठय़ा प्रमाणावर वाहतूक कोंडीचा सामना सर्वसामान्यांना करावा लागत असून वाहतूक पोलिसांसह संबंधित कंत्राटदारांचे त्याकडे लक्ष नाही.

विद्यार्थ्यांना शाळेत पोहोचण्यास विलंब

सेंट्रल एव्हेन्यूवर नित्याने सकाळी व संध्याकाळच्या वेळेला वाहतूक कोंडी राहते. वाहतुकीच्या नियोजनाचा अभाव असल्यामुळे बऱ्याचदा विद्यार्थ्यांना शाळेत पोहोचण्यास विलंब होतो. हा त्रास टाळण्याकरिता घरून लवकर निघाल्यावरही अनेकदा वाहतूक कोंडीला सामोरे जावे लागते. मेट्रोसह रामझुलाचे काम करणाऱ्या खासगी कंत्राटदारांसह वाहतूक पोलिसांनी येथे वाहतूक खोळंबणार नाही, म्हणून कर्मचारी वाढवून विशेष काळजी घेण्याची गरज आहे. त्यातच वाहतूक कोंडीमुळे अनेक रेल्वेस्थानकावर जाणारे प्रवाशीही अडकत असल्याने तेही ऑटोरिक्षा सोडून रेल्वेस्थानकाकडे पायीच निघतानाचे चित्र नेहमीच दिसते.

प्रशांत वाठ, ऑटोरिक्षाचालक

ऑटोरिक्षांची सर्कस व पोलिसांचे दुर्लक्ष

रामझुलाशेजारी काही ऑटोरिक्षाचालक प्रवाशी शोधत रस्त्यांवरच थांबतात. त्याकडे पोलीस दुर्लक्ष करीत असल्याने वाहतूक कोंडीत भर पडते. या प्रकाराने रुग्णवाहिका अडकून रुग्णांना रुग्णालयात पोहोचण्यास विलंब होतो, त्यांच्या जीवाला धोका संभावतो. हा त्रास टाळण्याकरिता पोलिसांनी तेथे  सक्रिय होण्याची गरज आहे.

रामू रगडे, नागपूर

धुळीचाही त्रास वाढला

कॉटन मार्केट परिसरातील नागपूर मेट्रोच्या कामादरम्यान बऱ्याच खडय़ांसह मोकाट जनावरे रस्त्यांवर असल्याचे दिसते. सोबत येथे रस्त्यांवर धूळ मोठय़ा प्रमाणात उडत असल्याने वाहन चालवतांना ती डोळ्यात जावून येथे अपघातही होतांना दिसतात. ही धूळ हवेत उडू नये म्हणून काळजी घेण्याची गरज आहे. त्यातच येथे संबंधित कंत्राटदाराने खासगी सुरक्षा रक्षक ठेवून सामान्यांना त्रास होऊ नये म्हणून काळजी घेण्याची गरज आहे.

नितीन गिरी, नागपूर

नियम तोडणाऱ्यांवर कारवाई कधी?

जयस्तंभ चौकातील मध्य रेल्वे आणि दक्षिण पूर्व मध्य रेल्वे नागपूर मंडळ कार्यालयात जाण्याकरिता तसेच या कार्यालयातून निघाल्यावर विरूद्ध दिशेने जावून अनेकजण सर्रास नियम तोडताना दिसतात. या प्रकाराने वाहतूक कोंडी होते. वाहतूक नियम मोडणाऱ्यांकडे वाहतूक पोलीस बघत असले तरी ते कारवाई करतांना दिसत नाही. तेव्हा या नागरिकांची नियम तोडण्याची वृत्ती जास्तच वाढत आहे. त्यांच्यावर पोलीस कारवाई कधी करणार हा एक प्रश्नच आहे.

– राजेश लोणारे, नागपूर

कोंडीची कारणे

*   रामझुला व मेट्रोच्या कामादरम्यान वाहतुकीचे नियोजनचा अभाव

*   एकाच मार्गावर दोन कामे

*   सेंट्रल एव्हेन्यूवरील प्रवेशद्वार

*   विरुद्ध दिशेने होणारी वाहतूक

*   रेल्वेस्थानकाच्या प्रवेशद्वारावरील मेट्रोचे काम

*  वाहतूक पोलिसांचे दुर्लक्ष