• रस्त्यांवर उभ्या वाहनांकडे विशेष लक्ष
  • धमरपेठ, गांधीबागमध्ये पोलिसांची कारवाई

दिवाळीच्या खरेदीसाठी मोठय़ा प्रमाणात नागरिक घराबाहेर पडतात. मात्र, रस्त्यांवर वाहने उभी केल्याने अनेकदा वाहतुकीस अडथळा होतो. त्यांचा अनेकांना मन:स्ताप होत असल्याने वाहतूक पोलिसांनी बाजारपेठ परिसरामध्ये नियमभंग करणाऱ्यांविरुद्ध कारवाईचा बडगा उगारला आहे. प्रामुख्याने धरमपेठ, गांधीबाग परिसरात वाहनांवर कारवाई करण्यात येत आहे.

दिवाळीनिमित्त बाजारपेठांमध्ये गर्दी होते. मात्र, नागरिक रस्त्यांवर वाहने उभे करून खरेदीला जात असल्याने तासन्तास वाहतूक खोळंबते. त्यामुळे यंदा वाहतूक चेंबर-२ आणि वाहतूक चेंबर-३ यांनी त्यांच्या परिसरातील बाजारपेठांवर विशेष लक्ष केंद्रित केले आहे. त्यामुळे खरेदी करताना पार्किंगसाठी ठरवून दिलेल्या जागेतच नागरिकांनी त्यांची वाहने उभी करावी आणि रस्ते  मोकळे असावे म्हणून उपायुक्त रवींद्र परदेशी यांच्या मार्गदर्शनात वरिष्ठ पोलीस निरीक्षक जयेश भांडारकर आणि वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक बागुल हे अधिकारी आपल्या चेंबर अंतर्गत कारवाई करीत आहेत. सकाळी १० वाजतापासून ते रात्री उशिरापर्यंत वाहतूक पोलीस रस्त्यांवर राहून वाहतूक कोंडी होणार नाही, यासाठी प्रयत्न करीत आहे. त्यामुळे नागरिकांनी रस्त्यांवर व ‘नो पार्किंग’च्या ठिकाणी वाहने उभी करू नयेत. तसेच एखाद्या ठिकाणी वाहतूक कोंडी झाल्यास नागरिकांनी ताबडतोब पोलीस नियंत्रण कक्षाला माहिती द्यावी, असे आवाहन दोन्ही चेंबरच्या अधिकाऱ्यांनी केले आहे.

आतापर्यंत ५ कोटींचे दंड

चेंबर-३ च्या वतीने कारवाई सुरू करण्यात आली असून जानेवारी ते सप्टेंबर २०१७ पर्यंत चेंबरने १ लाख २३ हजार ९३९ वाहनांवर कारवाई केली. यातून ५ कोटी ७० लाख १६ हजार १०० रुपयांचा दंड वसूल केला आहे. त्यात ई-चालानच्या ६२ हजार ४९५, मोटर वाहन कायद्याच्या इतर कलमांतर्गत ५५ हजार ८३०, दारू प्राशन करून वाहन चालवणारे ५ हजार ४९१ आणि अवैध प्रवाशी वाहतूक करणाऱ्या १२३ वाहनांवर कारवाई केली.

धरमपेठेत साडेचार हजारांवर वाहनांवर कारवाई धरमपेठ परिसरातील वाहतूक समस्या लक्षात घेऊन तेथे १७ जुलैपासून नो-पार्किंग झोन तयार करण्यात आला आहे. त्या अधिसूचनेची काटेकोर अंमलबजावणी करण्यात येत असून आता दिवाळीनिमित्त वाहतूक पोलिसांचा चोख बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. आतापर्यंत पोलिसांनी ४ हजार ८५८ वाहनांवर कारवाई केली असून ५ लाख २५ हजार २०० रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे. त्यात जामरच्या ३२१, टो-कारवाई ५७२, पिकअप ७१७, नो-पार्किंग १२३ आणि ई-चालानच्या ३ हजार १२५ कारवाया करण्यात आल्या.