जनाक्रोश हल्लाबोल आंदोलनाने वाहतूक यंत्रणा ढासळली

काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसच्या जनाक्रोश हल्लाबोल आंदोलनासाठी आलेली वाहने व लोकांमुळे निम्मे नागपूर वाहतूक कोंडीत अडकले. त्यातून वाट काढताना प्रचंड मन:स्ताप सहन करावा लागला.

सोमवारी राष्ट्रवादी काँग्रेसच्या हल्लाबोल दिंडीमुळे संपूर्ण वर्धा मार्गावरून नागपूरकडे येणारी वाहतूक ठप्प झाली होती. त्यात रुग्णवाहिका व स्कूलबसेस अडकल्या होत्या. त्यानंतर आज मंगळवारी पुन्हा नागपूरकरांना वाहतूक कोंडीचा सामना करावा लागला. सकाळी ११ वाजतापासून संपूर्ण विदर्भ व मराठवाडय़ातून काँग्रेस व राष्ट्रवादीचे कार्यकर्ते वाहनांसह येत होते. त्यांच्यासाठी शहराबाहेर वाहनतळाची व्यवस्था होती. मात्र, पोलिसांसोबत मुजोरी करून कार्यकर्त्यांनी त्यांची वाहने शहरात आणली. त्यामुळे दुपारी १२ वाजतापासून रहाटे कॉलनी, दीक्षाभूमी, जनता चौक, पंचशील चौक, महाराजबाग चौक, विद्यापीठ ग्रंथालय, लोहापूल, मोक्षधाम, धंतोली या परिसरात प्रचंड वाहतूक कोंडी झाली. एक किलोमीटर अंतर कापण्यासाठी वाहनांना अर्धा ते एक तास लागत होता. शेवटी स्थानिक नागरिक वाहतूक पोलीस व मेट्रोच्या स्वयंसेवकांवर नाराजी व्यक्त करीत होते. मोर्चा संपल्यानंतर सायंकाळी ७ वाजेपर्यंत लोकांना वाहतूक कोंडीचा सामना करावा लागला.

पोलीस उपायुक्तच भडकले

जनता चौक ते सीताबर्डी दरम्यान दुपारी १ वाजताच्या सुमारास प्रचंड वाहतूक कोंडी होती. एकही वाहन पुढे सरकत नव्हते. शिवाय जनता चौक परिसरात केवळ एक पोलीस शिपाई वाहतूक व्यवस्था सांभाळत होता. त्यामुळे परिमंडळ-२ चे उपायुक्त राकेश ओला यांनी वॉकी टॉकीवरून आपली नाराजी व्यक्त केली. त्यानंतर वाहतूक कोंडीच्या ठिकाणी अतिरिक्त पोलीस कर्मचारी नेमण्यात आले. आजच्या मोर्चावेळी अनेक चौकात वाहतूक व्यवस्था सांभाळणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्यांचे मनुष्यबळ कमी पडले.

स्कूलबसमध्ये मोर्चेकरी

विदर्भ ऑटोरिक्षा चालक महासंघाने मंगळवारी ऑटोरिक्षा चालकांच्या विविध मागण्यांसाठी पुकारलेल्या संपाला स्कूलबस चालकांच्या संघटनेने पाठिंबा दिला होता. त्यामुळे विद्यार्थ्यांना मनस्ताप झाला. मात्र, या बसेस विरोधी पक्षाने काढलेल्या मोर्चाच्या सेवेत होत्या. मोर्चेकऱ्यांना सोडल्यावर या बसेसच्या रांगा व्हीआयपी मार्गावर लागल्या  होत्या.

रुग्णवाहिकाही अडकल्या

विरोधी पक्षाच्या मोर्चामुळे झालेल्या वाहनकोंडीचा धंतोली, रामदासपेठ परिसरातील रुग्णवाहिकांनाही बसला. रुग्णांना घेऊन आलेल्या अनेक रुग्णवाहिका विविध मार्गावर अडकून पडल्या होत्या. काहींनी मार्ग बदलून रुग्णालय गाठले तर काही रुग्णवाहिका नागरिकांची गर्दी कमी झाल्यावर रुग्णालयात पोहचल्या.

सर्व मोर्चे एका मैदानावर असावेत

विधिमंडळ अधिवेशन काळात शहरात दररोज मोर्चे निघतात. त्यामुळे नागपूरकरांना नेहमी वाहतूक कोंडीचा सामना करावा लागतो. हे टाळायचे असल्यास मुंबईप्रमाणे नागपुरातील सर्व मोर्चे एखाद्या मैदानावर नेण्यात यावेत. कोणताही मोर्चा रस्त्यावर थांबवण्यात येऊ नये. राजकीय पुढारी स्वत:ची पोळी शेकण्यासाठी रस्त्यावर आंदोलन करून नागरिकांना वेठीस धरतात. हा प्रकार बंद व्हायला हवा.

– नीलेश काळे, सामान्य नागपूरकर.

वाहतूक कोंडीत एक तास

सायंकाळी कार्यालय सुटल्यानंतर सिव्हिल लाईन्समधून मानेवाडा येथे घरी जाण्यासाठी निघाले. त्यावेळी सायंकाळच्या सुमारास महाराजबागपासून ते रहाटे कॉलनीपर्यंत प्रचंड जाम होता. हा रस्ता ओलांडण्यासाठी जवळपास १ तास लागला. दरवर्षी होणारी वाहतूक कोंडी टाळण्यासाठी पोलिसांनी विशेष प्रयत्न करावेत.

– रिना तायडे, कर्मचारी,  टपाल विभाग.