रस्त्यांवर अपघातांची मालिका; रहिवासी, व्यावसायिक त्रस्त

राज्य सरकार, नागपूर सुधार प्रन्यास आणि नागपूर महानगरपालिका यांच्या सहभागाने शहरात रस्ते सिमेंटीकरणाचे जाळे विणले जात आहे. ही कामे अद्ययावत यंत्रांचा वापर करून गतिशील मार्गाने करण्यात येत आहे. तरीही नियोजनाच्या अभावामुळे वाहतुकीची कोंडी आणि छोटेमोठे अपघात असे चित्र दररोज दिसून येत आहे. छत्रपती चौक ते जयताळादरम्यान गेल्या दोन महिन्यांपासून सुरू असलेल्या रस्ते सिमेंटीकरणामुळे प्रामुख्याने प्रतापनगर चौकात वाहतुकीची पुरती वाट लागली आहे. परिसरातील रहिवासी आणि व्यावसायिकसुद्धा त्यामुळे त्रस्त झाले आहेत.

जयताळा ते छत्रपती चौक या पट्टय़ात अनेक रहिवासी वस्त्या, दवाखाने, औषधांची दुकाने, बँका, हॉटेल्स, शाळा आहेत. याच पट्टय़ात त्रिमूर्तीनगर चौक, प्रतापनगर चौक आणि ऑरेंज सिटी चौक असे तीन प्रमुख चौक येतात. या तीनही चौकात एक ते दोन फूट खोल अशी दरी तयार झाली आहे. प्रामुख्याने प्रतापनगर चौकात सकाळी ७ ते दुपारी १२ वाजेपर्यंत कामगारांचा ठिय्या असतो.

शाळा व महाविद्यालयात जाणारे विद्यार्थी याच मार्गाने जातात. या चौकातच सकाळी वृत्तपत्र विक्रेत्यांचीही गर्दी असते आणि याच चौकात शहर बस थांबाही आहे. त्यामुळे सकाळपासूनच हा चौक पूर्णपणे गजबजलेला असतो. रस्ते सिमेंटीकरणाचे काम सुरू झाल्यापासून आणि चौकातील खट्टय़ांमुळे वाहने मुख्य रस्त्यावर येताना दररोज छोटेमोठे अपघात घडतात.

काम सुरू झाल्याबरोबर पहिल्या पंधरा दिवसातच सकाळी ७ वाजताच्या सुमारास एक विद्यार्थिनी दुचाकीने जात असताना पडली. त्रिमूर्तीनगर आणि ऑरेंज सिटी चौकातील वाहतूक दिवे सुरू असले तरीही प्रतापनगर चौकातील वाहतूक दिवे गेल्या अनेक दिवसांपासून बंद आहेत. वाहतूक पोलीस याठिकाणी असतात, पण चौकातल्या झाडाखाली ते त्यांच्या दुचाकीवर बसून राहतात. वाहतूक कोंडी जेव्हा अनियंत्रित होते तेव्हाच ते उठून येतात.

वाहनधारकांच्या रांगा प्रचंड लांब असल्यामुळे अर्धा अर्धा तास वाहतुकीची कोंडी सुटत नाही. बेजबाबदार नियोजनामुळे परिसरातील रहिवासी आणि व्यावसायिक प्रचंड त्रस्त असून निदान चौक तरी त्यातून मोकळा करावा, अशी त्यांची मागणी आहे.

रस्ते सिमेंटीकरणाचे काम चौक ते चौक असे करायला हवे. ते पूर्ण झाल्यानंतरच तो मार्ग वाहतुकीसाठी खुला करून पुढच्या टप्प्यातले काम सुरू करायला हवे. मात्र, महानगरपालिकेच्या या गैरसोयीच्या आणि बेजबाबदार व्यवस्थापनामुळे पुरते हाल झाले आहेत. घरातून वाहने बाहेर काढणे तर दूरचीच गोष्ट, पण आपल्याच घरात आम्हाला जाणे मुश्कील झाले आहे. वाहतुकीची कोंडी झाली की प्रामुख्याने सायंकाळच्या वेळी वाहनधारक कर्णकर्कश हॉर्न वाजवत असल्याने तो एक त्रास सहन करावा लागतो. याशिवाय धुळीचा त्रास होतो ते वेगळाच. एकाचवेळी एवढय़ा लांब पल्ल्याचे काम काढून प्रवेश मार्गच महिने महिने बंद ठेवण्यात काय अर्थ, असा प्रश्न प्रतापनगर चौक परिसरातील रहिवाशी विभा जोशी यांनी उपस्थित केला.

गेल्या अनेक वर्षांपासून मी या चौकातल्या फुटपाथवर पुस्तके विकायला बसत आहे, पण पहिल्यांदाच याठिकाणी वाहतुकीचा असा बोजवारा उडालेला पाहात आहे. प्रामुख्याने सकाळी ११ वाजताच्या सुमारास आणि सायंकाळी ६ वाजताच्या सुमारास वाहतुकीची प्रचंड कोंडी दिसून येते. अर्धा अर्धा तास ही कोंडी सुटत नाही. रस्त्याच्या सिमेंटीकरणामुळे आधीच धुळीचा प्रचंड त्रास सहन करावा लागत असतानाच एकाच जागी बराचवेळ वाहने थांबून असल्यामुळे वाहनातून निघणाऱ्या धुरामुळेही श्वास कोंडायला लागला आहे. याच व्यवसायावर उदरनिर्वाह अवलंबून असल्यामुळे दिवसभर तोंडाला फडके बांधून बसण्याशिवाय पर्याय नाही, अशी खंत सतीश देवगडे या विक्रेत्याने व्यक्त केली.