दंडाच्या सुधारित दराप्रमाणे सहा दिवसांत १८ लाखांची वसुली

गेल्या फेब्रुवारी महिन्यापासून नागपूर वाहतूक पोलिसांनी नियम मोडणाऱ्या वाहनचालकांविरुद्ध कारवाईची मोहीम राबवित आहेत. आजवर पोलिसांनी कोटय़वधी रुपये सरकारी तिजोरीत जमा केले असून नवीन नियमानुसार दंडाच्या रकमेत भरमसाठ वाढ करण्यात आली आहे. नवीन दरानुसार वाहतूक पोलिसांनी सहा दिवसांमध्ये १८ लाखांवर दंड वसूल केला आहे. वाहतूक पोलिसांच्या दंड वसुलीमुळे सरकारी तिजारीतील ठणठणाट दूर व्हायला मोठा हातभार लागणार असल्याचे सांगण्यात येते.

परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी राज्यभरात हेल्मेट सक्तीचा निर्णय घेतला. या निर्णयासंदर्भात समाजामध्ये वेगवेगळे मतप्रवाह पाहायला मिळाले. मात्र, हेल्मेट सक्तीचा निर्णय लागू होताच राज्यभरात पोलीस नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांविरुद्ध कठोर कारवाई करू लागले. यात नागपूर वाहतूक पोलीस कुठेही कमी नाहीत. तेव्हापासून पोलिसांनी सातत्याने विनाहेल्मेट वाहनचालक, सिग्नल जंपींग, सीटबेल्ट नसणे, मद्य प्राशन करून वाहन चालविणे, विना विमा वाहन चालविणे, रस्त्याच्या विरुद्ध दिशेने वाहन चालिवणाऱ्यांविरुद्ध कारवाईचा बडगा उगारला. या कारवाईमध्ये शहरात हेल्मेट घालून वाहन चालविणाऱ्यांचे प्रमाण तर वाढले. मात्र, अद्यापही पाहिजे त्या प्रमाणात वाहतूक नियमांचे पालन होताना दिसत नाही. त्यामुळे वाहतूक पोलिसांनी कारवाई अधिक कडक केली आहे. दंडासाठी नवीन नियम लागू झाल्यापासून नागपूर पोलिसांनी सहा दिवसांमध्ये ८ हजार, २६९ वाहनचालकांविरुद्ध कारवाई केली. त्यातून १८ लाख, ८४ हजार, ७०० रुपयांचा एवढा दंड वसूल केला. जुन्या दंड दरानुसार ही रक्कम ८ लाख २६ हजार ९०० रुपयेच असती. त्यामुळे सरकारी तिजोरीतील ठणठणाट दूर होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

कारवाई नियमित सुरू राहणार

वाहतूक पोलिसांची कारवाई बाराही महिने सुरू राहणार आहे. नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांविरुद्ध कडक कारवाई करण्यात येईल. कोणालाही सूट मिळणार नाही. यानंतर कारवाई अधिक कडक करण्यात येणार आहे. कारवाईपासून वाचण्यासाठी नागरिकांनी नियमांचे पालन करावे आणि पोलिसांना सहकार्य करावे. नियम पाळल्याने कारवाई होणार नाही आणि वाहनचालकांचे पैसे वाचतील.

– स्मार्तना पाटील, पोलीस उपायुक्त, वाहतूक.