शहर पोलिसांकडून उपराजधानीत नागरिकांना वाहतूक नियम पाळण्याची शिस्त लागावी म्हणून ‘ई-चालान’सह विविध उपक्रम सुरू आहे. लवकरच एखाद्या नागरिकाने वाहतूक नियम मोडणाऱ्या वाहनाचे छायाचित्र पोलिसांना दिल्यास दोषी वाहनधारकाला घरपोच चालान देऊन कारवाई करण्यावर लवकरच चाचपणी केली जाणार आहे. त्यामुळे सामान्यांनाही शहरातील वाहतूक यंत्रणा सुधारण्याच्या उपक्रमात सहभागी होता येईल. याकरिता शहर पोलिसांकडून विशिष्ट यंत्रणा विकसित करण्यावर काम सुरू आहे.

नागपूर शहर पोलीस गेल्या काही महिन्यांपासून उपराजधानीत वाहतुकीचे नियम मोडणाऱ्यांवर वचक बसवण्यासाठी ‘ई-चालान’सह विविध उपक्रमावर भर देत आहे. त्याअंतर्गत शहरातील कोणत्याही चौकात वाहनधारकाने हेल्मेट न घातल्यासह कोणते नियम मोडल्यास त्याचे वाहतूक पोलिसांकडून छायाचित्र काढून संबंधिताला घरपोच चालान पाठवले जात आहे.

शहरात गेल्या काही महिन्यात सर्वाधिक वाहतूक नियम मोडणाऱ्यांवर कारवाई झाल्यावरही अपघात कमी होण्याचे नाव घेत नाही. शहरात नुकत्याच आलेल्या नवीन आकडेवारीवरून अपघातांमध्ये तब्बल ३१० जणांचा मृत्यू झाल्याचे पुढे आले. अपघाताचे आकडे बघता त्यावरील नियंत्रणात पोलिसांना अपयश आल्याचे दिसत आहे.

नागरिकांमध्ये वाहतुकीचे नियम मोडल्याची धडकी भरावी म्हणून शहर पोलिसांकडून लवकरच एक नवीन अभियानावर काम करण्यावर चाचपणी केली जाणार आहे. त्याअंतर्गत शहरातील कोणत्याही नागरिकाला वाहतूक नियम मोडणाऱ्याचे छायाचित्र पोलिसांना देता येईल. या वाहनधारकाला पोलिसांकडून वास्तविकतेत नियम मोडले असल्यास घरपोच चालान पाठवले जाईल. त्याकरिता पोलिसांकडून यंत्रणा विकसित करण्यावर काम केले जात आहे. या उपक्रमामुळे नागरिकांनाही शहरातील वाहतूक यंत्रणा स्मार्ट करण्याच्या उपक्रमात स्वत:चे योगदान देणे शक्य होणार आहे. हा उपक्रम सुरू झाल्यास तो राज्यात पहिलाच राहणार आहे, हे विशेष.

वाहतूक पोलिसांच्या कमतरतेवर उपाय

नागपूर शहराची लोकसंख्या २५ लाखाहून जास्त असून शहराचा वाढता व्याप बघता सर्वत्र वाहतूक पोलिसांचा बंदोबस्त ठेवणे शहर पोलिसांना शक्य नाही. तेव्हा शहर पोलिसांनी नागरिकांच्या छायाचित्रावरून नियम मोडणाऱ्यांवर कारवाई सुरू केली व नागरिकांनी सहभाग घेत हा उपक्रम यशस्वी केल्यास वाहतूक पोलिसांच्या कमतरतेवर मोठा दिलासा मिळण्याची आशा वाहतूक क्षेत्रातील जाणकार व्यक्त करीत आहेत.

‘परवाना रद्द करण्याचा प्रयत्न’

‘ई-चालान’सह विविध कारवाई अभियान राबवल्यावरही शहरात २०१६ मध्ये ३१० जणांचा रस्ता अपघातात मृत्यू झाला. ही संख्या गेल्यावर्षीपेक्षा जास्त आहे. तेव्हा पोलिसांना मृत्यू कमी करण्यात अपयश आले आहे, परंतु पोलिसांकडून यावर्षी मृत्यू नियंत्रणाकरिता पुन्हा नव्या दमाने प्रयत्न करण्यात येईल. शहर पोलिसांकडून नागरिकांनी वाहतूक नियम मोडणाऱ्यांचे छायाचित्र दिल्यास दोषींवर कारवाईबाबत चाचपणी केली जाणार आहे. त्याकरिता विविध विभागांची मदत घेतली जाईल. सोबत वारंवार वाहतूक नियम मोडणाऱ्या व्यक्तीचा परवाना रद्द करण्यात येईल, अशी माहिती शहर पोलीस आयुक्त डॉ. के. व्यंकटेशम यांनी प्रादेशिक परिवहन विभागाच्या वतीने रस्ता सुरक्षा अभियानाचा शुभारंभ कार्यक्रमात दिली.