प्रवासी वाहनांना अभय, नागरिकांच्या वाहनांवर कारवाई

एका पोलीस कर्मचाऱ्याच्या मुलीला ट्रकने चिरडल्यानंतर एलआयसी चौकात वाहतूक पोलिसांकडून वाहनांवर कारवाई सुरू आहे. या अपघातानंतर ही कारवाई होणार, अशी सर्वानाच अपेक्षा होती. मात्र, पोलीस कर्मचारी व अधिकारी प्रवासी वाहनांना अभय देऊन केवळ सामान्य नागरिकांच्या वाहनांवर कारवाई करीत असल्याचे दिसत आहे. त्यामुळे पोलिसांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह निर्माण करण्यात येत आहे.

पाचपावली परिसरातील सिंधी हिंदी महाविद्यालयात बारावीला शिकणारी साक्षी भूषणवार (२०) हिचा ३१ जानेवारीला सकाळी ११.४५ वाजताच्या सुमारास एलआयसी चौकात अपघात झाला. तिच्या दुचाकीला एका ट्रकने चिरडले. यात तिचा मृत्यू झाला. तिचे वडील नागपूर पोलीस दलात कार्यरत आहेत. त्यामुळे दुसऱ्या दिवसापासून एलआयसी चौकात वाहतूक पोलिसांकडून कारवाई करण्यात येईल, असे अपेक्षित होते.

त्यानुसार वाहतूक पोलिसांनी कारवाईला सुरुवात केली. मात्र, यावेळी पोलिसांनी केवळ रस्त्याच्या कडेला उभ्या करण्यात येणाऱ्या सामान्य नागरिकांच्या वाहनांवरच कारवाई केली. ही कारवाई बघून अनेकांनी पोलीस विभागावर नाराजी व्यक्त केली. एलआयसी चौक हा अवैध प्रवासी वाहतुकीचा अड्डा बनला आहे. या ठिकाणी कामठी, छिंदवाडा, मध्यप्रदेशात जाणारी वाहने तासनतास उभी राहतात. यात सहा आसनी ऑटोरिक्षांपासून ते खासगी बसगाडय़ांचा समावेश आहे. या बसेसच एक ते दोन रांगा व्यापून असतात.

प्रवासी वाहनांमुळे अनेकदा चौकात वाहतुकीची कोंडी अनुभवण्यात आली आहे. विशेष म्हणजे एलआयसी चौक ते कडबी चौकापर्यंत रस्ता दुभाजक नसल्याने प्रवासी वाहतूक करणारे बेजबाबदारपणे वाहने उभी करतात व ते अतिशय वेगाने दामटतात.

या सर्व बाबी वाहतूक पोलिसांना माहिती आहेत. कारण दिवसातले बारा तास एलआयसी चौक परिसरात सहाय्यक फौजदारासह तीन कर्मचारी त्या ठिकाणी कार्यरत असतात. पोलिसांच्या समोर प्रवासी वाहतूक करणारे नियमांचे उल्लंघन करतात, यावरून या प्रवासी वाहतुकीला पोलिसांचेच अभय असल्याचे स्पष्ट होते.

मात्र, एका पोलीस कर्मचाऱ्याच्या मुलीचा अपघात झाल्यानंतर वर्दीतील कर्मचारी जागा होईल आणि लोकांसाठी नाही, पण आपल्या सहकाऱ्यासाठी तरी येथील बेजबाबदार वाहतुकीला शिस्त लावण्याचे प्रयत्न करतील, असा अंदाज व्यक्त करण्यात येत होता. परंतु, हा अंदाज पोलिसांनी सपशेल खोटा ठरविला आणि रस्त्याच्या कडेला उभे राहणाऱ्या चाकरमान्यांच्या वाहनांवर कारवाई केली व प्रवासी वाहतूक करणाऱ्या वाहनांना अभय दिले.

अवैध प्रवासी वाहतुकीवर कारवाई का नाही?

एलआयसी चौकाच्या परिसरात रस्त्याच्या कडेला उभ्या राहणाऱ्या नागरिकांच्या वाहनांवर पोलिसांनी कारवाई केली. ही कारवाई करताना पोलिसांनी कोणतेही सूचना फलक लावले नव्हते. यामुळे नागरिकांना त्रास झाला. परंतु हे करीत असताना प्रवासी वाहतूक करणाऱ्या वाहनांवर कोणतीच कारवाई करण्यात आली नाही. पोलिसांची ही दुटप्पी भूमिका का? अवैध प्रवासी वाहतूक करणारे आणि चौकात उभ्या राहणाऱ्या खासगी बसेसवर पोलीस कारवाई का करीत नाही, असा प्रश्न पडतो.

श्रीराम सातपुते, सदस्य जिल्हा ग्राहक संरक्षण परिषद.

सर्वच प्रकारच्या वाहनांवर कारवाई

एलआयसी चौक परिसरात केवळ नागरिकांच्याच वाहनांवर कारवाई होते, हा आरोप योग्य नाही. या चौकात सर्वच प्रकारच्या वाहनांवर कारवाई करण्यात आली आहे. यात प्रवासी वाहतूक करणाऱ्या वाहनांचाही समावेश आहे. या कारवाईसंदर्भात सविस्तर आकडेवारी वाहतूक पोलीस देऊ शकतात. त्यामुळे प्रवासी वाहनांना पोलिसांचे अभय आहे, असे म्हणणे चुकीचे ठरेल.

– स्मार्तना पाटील, वाहतूक पोलीस उपायुक्त.