वाहतूक पोलीस उपायुक्तांकडून निलंबनाची कारवाई

एका वाहनावर कारवाई न करण्यासाठी दोनशे रुपयांची लाच घेणाऱ्या वाहतूक पोलिसाचा एक व्हिडीओ समाजमाध्यमांवर व्हायरल झाला. त्यानंतर वाहतूक पोलीस उपायुक्त रवींद्र परदेशी यांनी प्रकरणाची गांभीर्याने दखल घेऊन त्या कर्मचाऱ्याला निलंबित केले.

भुजंगराव खाटे असे कर्मचाऱ्याचे नाव असून तो चेंबर-३ अंतर्गत कार्यरत आहे. खाटे याची नोकरी कॉटन मार्केट चौकात असते. मात्र, शुक्रवारी प्रजासत्ताक दिनामित्त सकाळीच कामावर यावे लागले. परेड संपल्यानंतर तो कॉटन मार्केट चौकात आपल्या नोकरीच्या ठिकाणी न जाता कार्यालयात गेला. त्यावेळी दोसर भवन चौकातील चौकीमध्ये असताना एक लाल रंगाची स्वीफ्ट कार संशयास्पद दिसली. त्या कारला क्रमांक नव्हता. शिवाय कारचालकांनी सिग्नल तोडून कार दामटली होती. त्यामुळे खाटे याने ती कार थांबवली. कारमधून दोन तरुण बाहेर पडले. खाटे चालान बनवत असताना तरुणांनी चिरीमिरी घेऊन सोडण्याची विनंती केली. खाटे यांनी ६०० रुपयांची मागणी केली. तडजोडी नंतर तरुणांनी २०० रुपये देण्याचे कबूल केले आणि खाटेने पैसे खिशात ठेवून दिले. तरुणांनी चालानबद्दल विचारले असून ते देण्यास नकार दिला. या सर्व घटनेचा व्हिडीओ समाज माध्यमांवर व्हायरल झाला आणि वाहतूक पोलीस दलात एकच खळबळ उडाली. पोलीस उपायुक्त रवींद्र परदेशी यांना हा व्हिडीओ मिळताच त्यांनी संबंधितावर निलंबनाची कारवाई केली असून नोटीस बजावली.