रस्त्यांवर वाहनांच्या रांगा 

उन्हाळा म्हणजे लग्नसराई.. मंगल कार्यालये फुल्ल.. लग्नासाठी येणाऱ्या वऱ्हाडय़ांच्या वाहनांची रस्त्यावर लांबसडक जंत्री.. त्या परिसरातून जाणाऱ्या-येणाऱ्यांसाठी प्रचंड डोकेदुखी. जयताळापासून तर छत्रपती चौकापर्यंत सध्या अशाच डोकेदुखीचा सामना नागरिकांना करावा लागत आहे. यंदा या मार्गावर सुरू असलेल्या सिमेंट रस्त्यांच्या कामामुळे वाहतूक कोंडी ही या मार्गावरील मोठी समस्या बनली आहे.

जयताळा चौकातच ‘अनुसया’ मंगल कार्यालय आहे. यात वाहनतळांची व्यवस्था असली तरी तेथे येणाऱ्या वऱ्हाडय़ांना जाण्याची घाई असल्याने ते रस्त्यावरच वाहने उभी करतात. त्यामुळे वाहतूक कोंडी होतेच. याच परिसरात साईबाबा सभागृह, राई सभागृह, भगवती सभागृह आहेत. एकाच परिसरातील या सभागृहांमुळे आणि एकाच दिवशी मंगल कार्य असेल तर वाहतुकीची प्रचंड कोंडी होते. रविवार हा येथील बाजाराचा दिवस असल्याने यादिवशी हा त्रास आणखी वाढतो. त्रिमूर्तीनगर परिसरात अगदी रस्त्यावर राधेमंगलम कार्यालय आहे. वाहनतळांची पुरेशी व्यवस्था नसल्याने वाहने सिमेंट रस्त्यावरच उभी केली जातात. मंगल कार्यालयांच्या बेशिस्तीचा सर्वाधिक फटका ऑरेंजसिटी चौकातल्या रहिवाशांना, वाहतूकदारांना आणि विशेषत: रुग्णालयात जाणाऱ्या रुग्ण आणि त्याच्या नातेवाईकांना बसतो. परातेंचे दोन सभागृह आणि समोरच गुलमोहर सभागृह यामुळे रस्त्याच्या दोन्ही कडेला चारचाकी वाहनांच्या लांबचलांब रांगा लागतात. ऑरेंज सिटी चौकातून खामल्यात जाताना पराते सभागृहाच्या बाजूने जवळजवळ १०० मीटर अंतरावर कोणतीही प्रतिष्ठाने अथवा निवासी संकूल नाहीत. मात्र, येथे रस्त्यावरच किंवा अनेकदा रस्ता दुभाजकावर फोडण्यात येणाऱ्या फटाक्यांमुळे खामला परिसरातील पंजाब नॅशनल बँकेंपर्यंत अर्धाअर्धा तास वाहतूक कोंडी होते. एकीकडे फटाक्यांचा आवाज आणि  दुसरीकडे वाहतूक कोंडीमुळे बेजार वाहनधारक हॉर्न वाजवून ध्वनी प्रदूषणात भर घालतात. वाहनांमुळे होणारे वायू प्रदूषण वेगळेच. खामल्यातील छोटीमोठी दुकाने, निवासी संकुले असलेल्या ऐन वर्दळीच्या परिसरात अर्जुना नावाचे मोठे सभागृह झाले आहे. विशेषकरून या सभागृहात सायंकाळचे कार्यक्रम मोठय़ा प्रमाणावर असतात. वाहनतळाची सुविधा नसल्याने बाजारात वाहने उभी केली जाते. आता कुठे या कार्यालयाच्या तळघरात वाहनतळाचे काम सुरू आहे. या परिसरातील एका वसाहतीच्या शेवटी वाहनांच्या त्रासापायी ‘बॅरिकेट’ लावण्यात आले आहे. छत्रपती चौकातील प्रगती सभागृहातील वाहनतळ मात्र मोठे असल्याने याठिकाणी वाहतूक कोंडीचा प्रश्न नाही.

शिल्लक अन्न गोरक्षा केंद्रात द्या

मंगल कार्यालयात विवाह सोहोळ्यादरम्यान घडणाऱ्या जेवणावळी आणि त्यातून मोठय़ा प्रमाणावर अन्न उरते. हे अन्न कित्येकदा आजूबाजूच्या मोकळ्या आणि अडगळींच्या जागांवर टाकले जाते. उरलेले अन्न असे फेकण्याऐवजी ते शहरातील गोरक्षा केंद्रात नेऊन दिले तर त्याचा सदुपयोग होईल. मात्र, उकीरडय़ांवर फेकल्यामुळे रस्त्यावरील गाई-म्हशी ते खातात आणि ते देखील रोगराईचे बळी ठरतात. याच गाई-म्हशींचे दूध सर्व सामान्य खरेदी करतात. परिणामी तेही आजाराला बळी पडतात.

तक्रारींची दखलच नाही

यासंदर्भात कोणतीही तक्रार असल्यास १०० नंबरवर सांगा असे म्हणतात. आम्ही कित्येकदा या क्रमांकावर संपर्क साधला, पण अपेक्षित प्रतिसादच मिळत नाही. आमच्या तक्रारींची दखलही घेतली जात नाही. पोलिसांना दोष देऊन काय उपयोग, कारण ही जबाबदारी शेवटी त्या कार्यालयाच्या मालकाची आहे. मात्र, राजकीय आणि इतर संबंधांचा दाखला देत ते पोलिसांना ऐकत नाहीत. त्यामुळे कित्येकदा वाहतूक पोलीस या मंगल कार्यालयांमुळे झालेली वाहतुकीची कोंडी हाताळतात, पण रस्त्यावर उभ्या वाहनांवर कारवाई करण्याची हिम्मत दाखवत नाहीत. रस्त्यावर उभी वाहने उचलून नेणारे वाहतूक पोलिसांचे पथक अशावेळी कुठे जाते? असा प्रश्न खामल्यातील एका व्यावसायिकाने नाव न छापण्याच्या अटीवर केला.

बंदी आदेशाला हरताळ

मंगल कार्यालयाजवळ फटाके फोडण्यास बंदी आहे. रात्री दहानंतर वाद्यांचा आवाजाला बंदी आहे. त्याआधी वाजवल्या जाणाऱ्या वाद्यांचा आवाजही १०० डेसिबलपेक्षा अधिक नको. वरातीसाठी पोलिसांची परवानगी आवश्यक आहे. ही सर्व माहिती मोठय़ा फलकांवर मंगल कार्यालयात लावणे आवश्यक आहे. उच्च न्यायालयाने तशा सूचना दिल्या आहेत, पण सर्रासपणे त्या धुडकावल्या जातात. आम्ही स्वत: ध्वनी प्रदूषणासंदर्भात याचिका दाखल केली होती. शहर पोलीस आणि वाहतूक पोलिसांची यातील भूमिका महत्त्वाची आहे. त्यांना उच्च न्यायालयाच्या सूचनांची माहिती नसेल, तर या कायद्यांविषयी त्यांना ती माहिती करून द्यावी. जेणेकरून अशी परिस्थिती उद्भवल्यास ते थेट कारवाईचा बडगा उभारू शकतील.

रवींद्र भुसारी, सहयोग ट्रस्ट