राज्य शिक्षण मंडळाच्या बारावीच्या परीक्षेला आजपासून सुरुवात झाली.  पहिल्या दिवशी मेट्रो किंवा सिमेंटच्या रस्त्यांच्या कामांपेक्षाही पालकांनी लावलेल्या वाहनांमुळे परीक्षा केंद्र असलेल्या कनिष्ठ महाविद्यालयांसमोर वाहतूक खोळंबली.

दुपारी २ वाजता परीक्षा संपल्यावर रामदासपेठेतील सोमलवार शाळेसमोर पालकांच्या  गर्दीमुळे संपूर्ण रस्ताच व्यापला. त्यातच पालकांनी आडवीतिडवी वाहने उभी केल्याने वाहतूक कोंडीत अधिक भर पडली. त्याचा फटका रस्त्याने जाणाऱ्यांना बसला.

गुरुवारी  इंग्रजीचा पहिला पेपर सकाळी ११ वाजता सुरू झाला. विद्यार्थ्यांना १० वाजल्यापासूनच परीक्षा केंद्रांवर दाखल होण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या. मागील वर्षीप्रमाणेच यंदाही शिवाजी विज्ञान महाविद्यालय, धनवटे नॅशनल कॉलेज आणि न्यू इंग्लिश स्कूलच्या समोर १०.३० ते १०.४५  दरम्यान गर्दी झाली होती.

सिमेंटच्या रस्त्यांची कामे आणि मेट्रोच्या कामांमुळे गैरसोय होऊ नये म्हणून  केंद्राजवळ  गर्दी होणार नाही, याची काळजी वाहतूक पोलिसांनीही घेतली होती. महत्त्वाचे म्हणजे, एकेका केंद्रांवर अकराशे-बाराशे विद्यार्थी देण्याचे मंडळाने यावेळी टाळले. ४०० ते ५०० विद्यार्थी एका केंद्रावर होते. त्यामुळेही खोळंबा न होण्यास मदत झाली. गेल्यावर्षी धनवटे नॅशनल महाविद्यालयात ११०० विद्यार्थ्यांचे परीक्षा केंद्र देण्यात आले होते. यावेळी ५००च्या आसपास विद्यार्थी आहेत. तसेच एका बाकावर एकच विद्यार्थी बसण्याची सोय सर्व केंद्रांवर करण्यात आली.

सर्व परीक्षा केंद्रांवर सुरळीत परीक्षा पार पडली असून विद्यार्थी व पालकांना कोणत्याच अडचणींना तोंड द्यावे लागले नसल्याचे विभागीय मंडळाचे अध्यक्ष रविकांत देशपांडे यांनी सांगितले.

‘‘पालकांना फाटकाच्या बाहेरच ठेवण्यात येते. परीक्षेच्या आदल्या दिवशी २० फेब्रुवारीला आम्ही सर्व क्रमांक बाहेर फलकावर लावले होते. मुलगा मुलगी कोणत्या खोलीत, कोणत्या बाकावर बसणार आहे, याची खात्री पालकांनी आदल्या दिवशीपर्यंत करून घ्यायला हवी होती. अपंग विद्यार्थ्यांचे पालक १५ दिवसांपूर्वी पाहून गेले. दोन आसनी बाकावर एकच विद्यार्थी तर तीन आसनी बाकावर दोन विद्यार्थी बसवण्यात आले.’’

– स्नेहल पिंपळकुटे, मुख्याध्यापक, न्यू इंग्लिश स्कूल