रेल्वे नियमांवर दलालांची मात

नागपूर : रेल्वेचे तत्काळ तिकीट खरेदी करताना सर्वसामान्य होणारा त्रास काही केल्या कमी होताना दिसत नाही. तत्काळ तिकीट खरेदी करणाऱ्यांच्या रांगेत दलालांचे प्रतिनिधी दररोज दिसत असल्याची तक्रार प्रवाशांची आहे.

मोतीबाग रेल्वे तिकीट आरक्षित केंद्रावर उभे असलेल्या प्रवाशांनी यासंदर्भात तक्रार केली. या केंद्रावर रांगेतील पहिले पाचजण कुणाचे ना कुणा दलालाचे प्रतिनिधी म्हणून आलेले असतात, त्यापैकी अनेक चेहरे सारखे असल्याचे आढळून आले आहेत. सर्वसामान्य प्रवासी कितीही वाजता तिकीट रांगेत लागला तरी  त्याला पाचव्या क्रमांकानंतर संधी मिळते, असे प्रवाशांचे  म्हणणे आहे. दोन दिवसांपासून तत्काळ  तिकीट खरेदी करण्यासाठी या केंद्रावरील रांगेत असलेले एक प्रवासी साने म्हणाले, काल सकाळी ६ वाजता आणि आज सकाळी साडेपाच वाजता नाव नोंदवण्यासाठी आलो. परंतु दोन्ही दिवस सहा आणि सातवा क्रमांक लागला. पहिले पाच क्रमांक कोणाचे आहेत. याबाबत खुलासा होणे आवश्यक आहे. प्रवाशांकडून जादा पैसे घेऊन दलाल रांगेत उभे राहतात. नावाची नोंदणी प्रवाशाच्या नावाने होते. त्यामुळे तिकीट काढणारे दलालाचे प्रतिनिधी असले तरी  रजिस्टरमध्ये  नावाची नोंद प्रवाशाची असते. सकाळी ११ वाजता तिकीट खिडकी उघडताच सर्वप्रथम दलालांना रांगेत उभे केले जाते. तोपर्यंत तत्काळ तिकीट संपलेली असतात, अशाप्रकारे सर्वसामान्य प्रवाशांना तत्काळ तिकीट मिळत नाही. तात्काळ तिकीट खरेदी करण्यासाठी भराव्या लागणाऱ्या  फार्ममध्ये अर्जदार किंवा प्रतिनिधी असा उल्लेख आहे. त्याचा फायदा दलाल घेत प्रवाशांकडून जादा पैसे घेऊन तिकीट काढण्यासाठी रांगेत राहतात. दररोज किंवा एक दिवसआड तेच-तेच चेहरे दिसत असून सुद्धा आरपीएफ जवान किंवा तिकीट बुकिंग क्लार्क हरकत का घेत नाहीत, असा आक्षेप प्रवाशांनी केला आहे.

आरपीएफजवळ नोंदवही देण्यात आली आहे. एकसारखे नाव वारंवार येऊ शकत नाही. प्रवाशाचे प्रतिनिधी म्हणून कुणीही तिकीट खरेदी करू शकतो. मात्र, दलालांना आळा घालण्यासाठी तिकीटासाठी रांगेत असलेल्यांना ओळखपत्र अनिवार्य करण्याच्या सूचना देण्यात येतील.’’

– आशुतोष श्रीवास्तव, वरिष्ठ विभागीय वाणिज्य व्यवस्थापक, दक्षिण-पूर्व-मध्य रेल्वे.

दलालांची क्लृप्ती

तत्काळ तिकीट योजनेनुसार प्रवासाच्या एकदिवस आधी रेल्वे तिकीट खरेदी करण्यायी सोय आहे. त्यासाठी दररोज सकाळी ११ वाजता तिकीट खरेदीला सुरुवात होते. त्यासाठी सकाळपासून रांगेत लोक राहतात म्हणून मोतीबाग केंद्रावर नोंदवही ठेवण्यात येत आहे. त्यात नाव नोंदवून नंतर क्रमांकानुसार तिकीट खरेदीसाठी बोलावण्यात येते, परंतु येथे दररोज पाच क्रमांक आधीच ठरलेले असतात.