• मेडिकल, मेयोच्या चार विभागांना फटका
  • आंदोलकांचे अधिष्ठाता कार्यालयापुढे निदर्शने

उपराजधानीतील मेडिकल, मेयोच्या ३५० प्रशिक्षणार्थी डॉक्टरांनी (इंटर्न्‍स) मानधन वाढीच्या मागणीसाठी मंगळवारी मध्यरात्रीपासून पुकारलेल्या संपामुळे दोन्ही रुग्णालयातील चार विभागाची रुग्णसेवा विस्कळीत झाली होती. आंदोलकांनी मेडिकलच्या अधिष्ठाता कार्यालयापुढे निदर्शने केली. रुग्णालय प्रशासनाने मात्र रुग्णसेवा सुरळीत असल्याचा दावा केला आहे.

मेडिकल, मेयोसह राज्यभरातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयांत कार्यरत दोन हजार प्रशिक्षणार्थी डॉक्टर विविध वैद्यकीय सेवा देत आहेत. हे डॉक्टर रक्ताचे नमुने घेणे, तपासणी अहवाल पाहणे, रुग्णांचा रक्तदाबासह इतर तपासणी करणे, रुग्णांना गरज भासल्यास तातडीने रक्तपेढीतून रक्त उपलब्ध करण्यासह इतरही बरीच कामे करत असतात, परंतु शासनाकडून लेखी आश्वासनानंतरही या डॉक्टरांचे मानधन वाढवले नाही. त्यामुळे शेवटी नाईलाजाने संपांवर गेल्याचा आंदोलकांचा दावा आहे. पहिल्या दिवशी मेडिकल, मेयोच्या सर्व विभागांवर परिणाम जाणवला नाही, परंतु सर्वाधिक रक्तासह विविध तपासणीचा भार असलेल्या स्त्रीरोग व प्रसूती विभाग, अस्थिरोग विभाग, औषधशास्त्र विभाग, शस्त्रक्रिया विभागातील रुग्णसेवा विस्कळीत झाली होती.

प्रशासनाने या विभागांतील वार्डात निवासी डॉक्टर वाढल्याचे सांगत काहीही परिणाम झाला नसल्याचे सांगितले, परंतु अनेक नातेवाईकांनी दाखल रुग्णांची वेळेवर वैद्यकीय तपासणी न होण्यासह नेहमीच्या तुलनेत कमी रक्तासह इतर नमुने घेण्यात आल्याचा आरोप केला आहे. दरम्यान, आंदोलकांनी सकाळी मेडिकलच्या अधिष्ठाता कार्यालयात गोळा होऊन शासनाच्या विरोधात निदर्शने करत रॅली काढली. उचित वेतन हाच आमच्या कामाचा मोबदलासह इतरही उद्भोषण याप्रसंगी देण्यात आले. शासनाने प्रशिक्षणार्थी डॉक्टरांना दिलेल्या लेखी आश्वासनाची पूर्ती केल्याशिवाय माघार घेणार नसल्याचे आंदोलकांनी शासनाला सांगितले. न्याय न मिळाल्यास आंदोलन आणखी तीव्र करण्याचा इशारा याप्रसंगी देण्यात आला.