• चारपैकी दोन विभागांतच बदलीसत्र
  • एकवाक्यता न राखल्याने समितीवर टीका

विभागीय स्तरावरील बदल्यांसाठी गठित समितीनेच बदल्या करताना एकवाक्यता न राखल्याने वनखात्याच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या या समितीवर प्रचंड टीका होत आहे. सहा वर्षांपेक्षा अधिक काळ एकाच ठिकाणी असलेले हिशेबनीस, कर्मचारी यांच्या बदल्या करताना नागपूर, गोंदिया, वर्धा, भंडारा अशा चारही विभागांत बदली सत्र राबवणे गरजेचे होते. मात्र, केवळ नागपूर आणि गोंदिया वन्यजीव विभागातच बदली सत्र राबवण्यात आले. त्यातही एकवाक्यता न राखल्याने बदलीचे हे प्रकरण आपल्या अंगावर शेकणार हे लक्षात येताच काही अधिकाऱ्यांनी त्यांचे भ्रमणध्वनी बंद करून ठेवले आहेत.

वनखात्यात विभागीय स्तरावर ज्यांना एकाच ठिकाणी सहा वर्षांहून अधिक काळ लोटला त्यांची इतर विभागात बदली करण्यासाठी नागपूर प्रादेशिक विभागाचे मुख्य वनसंरक्षक टी.एस.के. रेड्डी यांच्या अध्यक्षतेखाली समिती गठित करण्यात आली. या समितीत पेंच व्याघ्र प्रकल्पाचे मुख्य वनसंरक्षक एम.एस. रेड्डी व मुख्य वनसंरक्षक महीप गुप्ता सदस्य होते. या समितीने दिलेल्या नावांच्या बदल्यांचे आदेश मंत्रालयातून २७ मे रोजी निघाले. यात केवळ नागपूर आणि गोंदिया विभागातच बदलीसत्र राबवण्यात आले. त्यातही नागपूर प्रादेशिक विभागातील बदल्या करण्यात आल्या आणि वन्यजीव खात्यातील कर्मचाऱ्यांना हातदेखील लावण्यात आला नाही.

पेंच व्याघ्र प्रकल्पातील कार्यालयात ८ ते १५ वषार्ंपासून एकाच पदावर असलेले हिशेबनीस व कर्मचारी आहेत.  विभागीय बदली सत्रादरम्यान त्यांच्या बदल्या करण्यात आल्या नाहीत. वर्धा आणि भंडारा विभागातही बदलीसत्र फारसे राबवण्यात आले नाही, तर समितीने वन्यजीव विभागातील बदल्यांकडे कानाडोळा केला. या संपूर्ण बदलीसत्रात समितीतील एका सदस्याचा हस्तक्षेप होता आणि त्यांचे मंत्रालयातील हितसंबंध लक्षात घेऊनच हे बदलीसत्र राबवण्यात आल्याची चर्चा वनविभागाच्या वर्तुळात होती. यासंदर्भात मंत्रालयातील वरिष्ठ अधिकारी पी.एन. मुंडे यांना विचारले असता असा कुठलाही दबाव नव्हता. तर प्रशासकीय गरजेनुसारच या बदल्या करण्यात आल्याचे स्पष्टीकरण त्यांनी दिले.

सहा वर्षांंहून अधिक काळ झालेल्यांची बदली इतर विभागात करण्यात यावी असा कुठलाही नियम नाही. वर्धा विभागात आणि वन्यजीव विभागात बदलीसत्र राबवण्यात आलेले नाही, कारण तेथे वन्यजीवांचा फारसा प्रश्न नाही असे आश्चर्यकारक उत्तर त्यांनी दिले.

रुजू होताच दुसऱ्याच दिवशी बदली

वनखात्यात विभागीय स्तरावर बदलीसत्र राबवताना पदोन्नतीनंतर बदलीच्या ठिकाणी रुजू झालेल्या वनपरिक्षेत्र अधिकाऱ्याच्या हातात दुसऱ्याच दिवशी दुसऱ्या ठिकाणी बदलीचे आदेश ठेवण्यात आले. वनखात्याच्या या अजब कारभाराने तो वनपरिक्षेत्र अधिकारीही चक्रावला. श्री. तुले यांची उमरेड-करांडला अभयारण्यात वनपरिक्षेत्र अधिकारी म्हणून पदोन्नतीने बदली करण्यात आली. पेंच व्याघ्रप्रकल्पालगत हे अभयारण्य येत असल्याने व्याघ्रप्रकल्पाच्या नागपूर कार्यालयात श्री. तुले बुधवारला रुजू होण्यासाठी गेले. त्यानंतर गुरुवारी त्यांच्या हातात नवेगाव-नागझिरा व्याघ्रप्रकल्पात बदलीचे आदेश ठेवण्यात आले. राज्याचे प्रधान मुख्य वनसंरक्षक (वनबलप्रमुख) सर्जन भगत यांच्या स्वाक्षरीनिशी हे आदेश निघाले आहेत. या संदर्भात पी. एन. मुंडे यांना वनपरिक्षेत्र अधिकारी श्री. तुले यांच्या बदलीसंदर्भात विचारणा केल्यानंतर प्रशासकीय गरज म्हणून ही बदली करण्यात आली. जिथे जशी गरज तशी बदली करण्यात येते. क्षेत्र संचालकांच्या मागणीनुसारच आदेश बदलवण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.