करोनाग्रस्तांना मोठा दिलासा

नागपूर : वाढत्या करोना रुग्णांमुळे  शहरात  रुग्णवाहिकांचा प्रचंड तुटवडा जाणवत आहे. हा तुटवडा दूर करण्यासाठी महापालिकेच्या परिवहन विभागाने २५ शहर बसेस रुग्णवाहिकेत रूपांतरित केल्या आहेत. या बसमध्ये प्राणवायू राहणार आहेत. याशिवाय १६  बसेस शववाहिका म्हणून उपयोगात आणल्या जात आहेत.

अनेक रुग्णांना  रुग्णालयापर्यंत जाण्यासाठी वेळेवर  रुग्णवाहिका मिळत नाही, खाजगी वाहनाने जावे लागते. ही बाब लक्षात घेऊा्न महापौर दयाशंकर तिवारी यांनी बसेस रुग्णवाहिकेत रूपांतरित करण्याचा प्रस्ताव दिला, प्रशासनाने तो मान्य केला. प्रत्येक झोनमध्ये २ याप्रमाणे २० रुग्णवाहिका राहणार  आहे. यात एक परिचारिका राहणार आहे. पाच रुग्णवाहिका सिव्हिल लाईन येथील कार्यालयात राहणार आहे. गृहविलगीकरणातील कुणाची प्रकृती बिघडली  तर तात्काळ आपापल्या भागातील झोन कार्यालयात संपर्क साधावा, असे आवाहन परिवहन विभागाच्यावतीने करण्यात आले आहे.

शिवाय परिवहन विभागातील १६ बसेस या शववाहिका म्हणून तयार करण्यात आल्या असून एकावेळी दोन ते तीन पार्थिव या बसने घेऊन जाण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. प्रारंभी पाच बसेस या शववाहिका म्हणून सुरू करण्यात आल्या असून आता ११ बसेस पुन्हा शववाहिका म्हणून सुरू करण्यात आल्या असून या सुद्धा प्रत्येक झोनमध्ये राहणार असल्याचे माजी परिवहन सभापती बंटी कुकडे यांनी सांगितले.

निर्णय घेताना अडचणी

महापालिकेच्या परिवहन विभागातील सदस्यांनी राजीनामा दिल्यानंतर दीड महिन्यापूर्वी झालेल्या सर्वसाधारण सभेत नव्या पाच सदस्यांची नियुक्ती करण्यात आली. त्यात पुन्हा एकदा बंटी कुकडे यांची परिवहन विभागाचे सभापती म्हणून निवड करण्याचा निर्णय पदाधिकाऱ्यांकडून घेण्यात आला. परिवहन विभागाची बैठक होऊन त्यात निवड केली जात असताना जिल्हा प्रशासनाकडून याबाबत अजूनही कुठलेही आदेश निघाले नसल्याने गेल्या दीड महिन्यापासून परिवहन विभागाला सभापती नाही आणि व्यवस्थापक सुद्धा नाही. त्यामुळे परिवहन विभागाकडून कुठलाही निर्णय घेताना अडचणी येत आहे.