काजूच्या नावाखाली वाहतूक

विषारी सुपारी भाग ४

शहरात विषारी सुपारीचा गोरखधंदा जोरात सुरू असून दक्षिण-पूर्व-मध्य रेल्वेचे इतवारी रेल्वेस्थानक व भंडारा मार्गावरील दोन ट्रान्स्पोर्ट प्लाझामधून सुपारीची तस्करी होत असताना अन्न व औषध प्रशासन आणि नागपूर शहर पोलीस गाढ निद्रेत असल्याचे दिसून येत आहे.

दीड ते दोन वर्षांपूर्वी युवासेनेच्या एका पदाधिकाऱ्याने सडक्या सुपारीविरुद्ध आंदोलन केले आणि त्यानंतर हे प्रकरण उघडकीस आले. त्यावेळी अन्न व औषध प्रशासन विभागाने इतवारी रेल्वेस्थानकावर एका रेल्वेगाडीतून कोटय़वधीची सुपारी जप्त केली होती. त्यानंतर रेल्वेमधून अशाप्रकारची वाहतूक बंद होईल, अशी अपेक्षा होती. मात्र, अन्न व औषध प्रशासन, पोलीस, रेल्वे आणि राजकीय पक्षाच्या काही नेत्यांशी संगनमत करून पुन्हा रेल्वेतून विषारी सुपारीची तस्करी बिनबोभाटपणे केली जात आहे. त्याशिवाय पारडी आणि कळमना परिसरात दोन ट्रान्सपोर्ट प्लाझा आहेत. त्या ठिकाणी अनेक वाहतूक व्यावसायिकांची गोदामे आहेत. या ठिकाणाहूनही मोठय़ा प्रमाणात वाहतूक करण्यात येते. काजूच्या नावाखाली ही तस्करी केली जाते, हे विशेष. त्यामुळे अन्न व औषध प्रशासन विभाग कारवाई करीत नसेल तर रेल्वे पोलीस, लोहमार्ग पोलीस किंवा स्थानिक पोलिसांनी याकडे लक्ष घालून कारवाई करावी, अशी मागणी जोर धरत आहे.

यासंदर्भात युवासेनेचे शहर उपाध्यक्ष टिंकू दिगवा यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी सांगितले की, याबाबत अन्न व औषध प्रशासनाला निवेदन देऊन माहिती देण्यात आली आहे. मात्र, त्यांच्याकडून कोणतीही कारवाई करण्यात येत नाही. सल्फरच्या भट्टीत भाजलेली सुपारी ही आरोग्यास हानीकारक असून त्यातून अल्पवयातच कर्करोग होण्याची अधिक शक्यता बळावते, असेही दिगवा म्हणाले.

सुपारी विषारी अशी होते

नायजेरिया आणि थायलंड येथे मृतदेह जाळण्यासाठी वापरण्यात येणारी सडकी सुपारी समुद्रमार्गे भारतात येते. कोलकाता, गुजरात येथील बंदरावर ती सुपारी काजू असल्याचे सांगण्यात येते आणि नागपुरात आणून येथे सल्फर डायऑक्साईडच्या भट्टीत भाजली जाते. त्यामुळे ती सुपारी टणक येते. यानंतर सुपारी कापून खर्रा, गुटखा, गोड सुपारी आदी उद्योगात वापरण्यात येते. सडलेली सुपारी व्यापाऱ्यांना ७० ते ८० रुपये प्रती किलो मिळत असून ती भट्टीत भाजल्यानंतर ३०० ते ४०० रुपये प्रती किलो विकली जाते. मात्र, सल्फरच्या भट्टीत सुपारी भाजल्याने ती सुपारी विषारी होते.


रेल्वे, ट्रकने तस्करी करणारे व्यापारी

रेल्वे आणि ट्रकद्वारे मध्यप्रदेश, गुजरात, उत्तर प्रदेश आदी भागात मोठय़ा प्रमाणात रेल्वे व ट्रकद्वारे तस्करी करणाऱ्यांमध्ये काही ठराविक नावे घेतली जातात. त्यात प्रामुख्याने हारूभाई, टिकू, जतीन, गनी, नेपाली, आनंद, मेहता, जैन, वेनसानी, गणपती, तिरुपती, अल्ताफ, इमरान, आशिक, वसीम, महेंद्र काल्या आदींची नावे घेतली जातात. सर्वाना त्यांची माहिती असतानाही त्यांच्यावर कोणतीच कारवाई होत नाही, हे विशेष.