‘ट्रामा केअर सेंटर’चे उद्घाटन व तीन ‘आयसीयू’चे भूमिपूजन
शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील रुग्णालयात उपचार घेणाऱ्या सगळ्याच रुग्णांना अत्याधुनिक व दर्जेदार वैद्यकीय सुविधा मिळायला हव्या. नागपूरच्या मेडिकल, मेयोत बऱ्याच अडचणी असल्या तरी डॉक्टरांकडून सेवेचे व्रत अंगिकारले जात आहे. दोन्ही संस्थांचा शासनाकडून येत्या चार वर्षांत देशातील सवरेत्कृष्ट महाविद्यालय म्हणून विकास केला जाईल. येथे जागतिक दर्जाच्या सोई उपलब्ध केल्या जातील, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.
शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय परिसरातील ‘ट्रामा केअर सेंटर’चे उद्घाटन आणि ‘आयसीयू’च्या भूमिपूजन कार्यक्रमात ते बोलत होते. कार्यक्रमाला प्रामुख्याने केंद्रीय भूपृष्ठ वाहतूकमंत्री नितीन गडकरी, पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, मुख्य सचिव स्वाधीन क्षत्रीय, आमदार सुधाकर कोहळे, विकास कुंभारे, सुधाकर देशमुख, नागो गाणार, वैद्यकीय शिक्षण विभागाच्या अपर सचिव मेघा गाडगीळ, विभागीय आयुक्त अनुप कुमार, जिल्हाधिकारी सचिन कुर्वे, सहसंचालक डॉ. प्रकाश वाकोडे, अधिष्ठाता डॉ. अभिमन्यू निसवाडे उपस्थित होते. मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, मध्य भारतातील गरजू रुग्णांसाठी अत्यंत उपयुक्त असलेल्या ‘ट्रामा सेंटर’मुळे रुग्णांना वेळीच उपचार मिळेल.
सेंटरकरिता सातत्याने पाठपुरावा केल्यानंतर अत्याधुनिक सुविधेसह रुग्णांच्या सुविधेसाठी हे केंद्र सज्ज झाले आहे. या संस्थेत उपचाराकरिता येणाऱ्या रुग्णांची संख्या वाढत असल्याने रुग्णालयात पायाभूत सुविधेमध्ये वाढ करणे आवश्यक आहे. येणाऱ्या रुग्णांना चांगल्या वैद्यकीय सुविधा देणाऱ्या डॉक्टरांचे त्यांनी अभिनंदन केले. मेडिकलला गौरवशाली परंपरा पुन्हा प्राप्त व्हावी यासाठी सर्व पायाभूत सुविधा येत्या तीन चार वर्षांत उपलब्ध करून देण्यात येतील आणि देशातील सवरेत्कृष्ट महाविद्यालय म्हणून ओळख निर्माण होईल, असेही मुख्यमंत्री म्हणाले.
नितीन गडकरी म्हणाले की, अपघात झाल्यावर तात्काळ वैद्यकीय सुविधा मिळावी यासाठी ‘ट्रामा केअर सेंटर’ची आवश्यकता होती. या केंद्रामुळे ती पूर्ण झाली. शासकीय रुग्णालयात रुग्णांना देण्यात येणाऱ्या वैद्यकीय सुविधेमध्ये गुणात्मक सुधारणेची गरज आहे. त्याकरिता वैद्यकीय महाविद्यालयामध्ये प्रशासन व आरोग्य सुविधा, असे दोन स्वतंत्र विभाग करून अधिष्ठात्यांकडे केवळ उपचारा संदर्भातच जबाबदारी असावी.
डॉक्टरांचा बदल्यांना विरोध असतो. तेव्हा बदल्या होताच ते नेत्यांसह मित्र असलेल्या अधिकाऱ्यांची मदत घेतात. हा प्रकार बंद करण्याकरिता शासनाने डॉक्टरांच्या बदल्या होऊ नये यासाठी प्रयत्न करण्याची गरज त्यांनी विषद केली.
पालकमंत्री बावनकुळे यांनीही याप्रसंगी मार्गदर्शन केले. अधिष्ठाता डॉ. अभिमन्यू निसवाडे यांनी प्रस्तावना तर डॉ. स्वाती हिवसे यांनी आभार मानले.

स्टुडन्ट सोसायटीकडून दुष्काळग्रस्तांकरिता ५ लाख 
महाराष्ट्रातील अनेक भागात दुष्काळ पडला असून, त्यांच्या मदतीकरिता मेडिकलचे विद्यार्थी सरसावले आहे. येथील स्टुडन्ट को- ऑप. सोसायटीच्या वतीने शनिवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना ५ लाख रुपयांचा धनादेश मुख्यमंत्री सहायता निधीकरिता देण्यात आला.

आरएसटी कॅन्सर रुग्णालयाला ४७ कोटी
नागपुरात कर्करोगग्रस्तांना चांगले उपचार मिळावे म्हणून केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने नागपूरच्या राष्ट्रसंत तुकडोजी महाराज कॅन्सर रुग्णालयाला ४७ कोटी रुपये देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यातील २७ कोटी रुपये यावर्षी उपलब्ध होतील. सोबत एम्सकरिता २५०० कोटी यंदा उपलब्ध होणार असून, मेडिकल आणि एम्समध्ये समन्वय साधून येथे काही करता येईल काय? याचा प्रशासनाने अभ्यास करून प्रस्ताव द्यावा. पंतप्रधान व आरोग्यमंत्र्यांशी चर्चा करून रुग्णांना लाभ देण्याची ग्वाही नितीन गडकरी यांनी दिली. देशात सध्या २२ टक्के वाहन चालकांची कमतरता असून ही गरज कौशल्य विकासातून पूर्ण करणे शक्य असल्याचे ते म्हणाले.