नवीन नियमावली बघून प्रवाशी स्तब्ध; टाळेबंदीनंतरच्या पहिल्या उड्डाणासाठी विमानतळ सज्ज

टाळेबंदीच्या चौथ्या टप्प्यात अखेर अटी आणि शर्तीवर देशांतर्गत विमान प्रवासाचा मार्ग मोकळा झाला आहे. परंतु या प्रवासासाठी जी नवीन नियमावली जाहीर करण्यात आली आहे ती बघून प्रवाशांच्या तोंडचे पाणीच पळणार आहे. कारण, विमान प्रवास करताना  एकमेकांकडे बघून बोलता येणार नाही,वारंवार शौचालयात जाता येणार नाही. प्रवाशांनी प्रिन्ट काढून बॅगेवर स्वत:च  टॅग करावे लागेल. ते जमत नसल्यास जाड कागदावर पीएनआर आणि नाव लिहावे लागेल.

२५ मे पासून देशांतर्गत विमान वाहतूक सुरू होत आहे. त्यासाठी नागपूर विमानतळ प्रशासनाकडे नवीन मार्गदर्शक सूचना प्राप्त झाल्या आहेत. त्यानुसार विमानतळाच्या सुज्जतेचा आज आढावा घेण्यात आला. मात्र, विमान प्रवासासाठी जारी करण्यात आलेल्या सूचनांची यादी बघून विमान प्रवास करावा की नाही, असा प्रश्न प्रवाशांच्या मनात उपस्थित झाला आहे.

याबाबतच्या मार्गदर्शक सूचना आज प्राप्त झाल्या. यामध्ये  प्रामुख्याने विमानात प्रवाशांना एकमेकांकडे बघून बोलता येणार नाही. विमानात शौचालसमोर रांग लागणार नाही. वारंवार शौचालयाचा वापर करता येणार नाही. प्रवाशांना स्वत:च ई-बोर्डिग पास घ्यावे लागेल. प्रवाशांना एक हँडबॅग आणि एक लगेज बॅग

बाळगता येईल. बॅगेज ड्राप काऊंटरवर कर्मचाऱ्याला पीएनआर दाखवावा लागेल. तसेच  आरोग्य सेतू अ‍ॅपवरील सध्या स्थिती दाखवावी लागेल. ते नसल्यास घोषणापत्र भरावे  लागेल, अन्यथा बोर्डिग पास दिला जाणार नाही. मार्गदर्शक सूचनानुसार प्रवासासाठी पात्र नसतानाही प्रवास करताना आढळल्यास दंडात्मक कारवाई करण्यात येईल.  अधिकृत टॅक्सीच भाडय़ाने घ्यावी लागेल. रोकड घेतली जाणार नाही. सर्वत्र डिजिटल पेमेंट करावे लागेल. अवस्थ, थकवा आल्यासारखा वाटल्यास ताबडतोब कर्मचाऱ्यांना माहिती द्यावी लागेल. वर्तमानपत्र, खाद्यपदार्थ मिळणार नाही. फक्त पाण्याची बाटली मिळेल, अशा  सूचनांचा समावेश आहे. दरम्यान, नागपूर विमानतळावर टर्मिनल इमारतीमध्ये प्रस्थान प्रवेशद्वारापर्यंत शारीरिक अंतराचे नियम पाळण्यासाठी फूट मार्क स्टिकर चिटवण्यात आले आहेत. तसेच टर्मिनल इमारतीच्या आत देखील अशाच प्रकारे फूट मार्क लावण्यात आले आहेत.

‘‘देशाअंतर्गत विमानसेवा २५ मे पासून सुरू होत आहे. त्यासाठी आज मार्गदर्शक सूचना आल्या आहेत. त्यादृष्टीने नागपूर विमानतळ सज्ज करण्यात आले आहे. ’’

– आबिद रुही, वरिष्ठ विमानतळ संचालक, नागपूर विमानतळ.