१५ मार्चपर्यंतच देयके स्वीकारली जाणार

मार्च महिन्याच्या अखेरीस शिल्लक राहिलेला निधी सरकारकडे परत जाऊ नये म्हणून कोषागार कार्यालयात एकाच वेळी सादर करण्यात येत असलेल्या निधीमुळे कोषागार कार्यालयात होणारी देयकांची गर्दी आणि त्यामुळे या कार्यालयावर वाढणारा कामाचा भार लक्षात घेता तो कमी करण्यासाठी यंदा वित्त विभागाने प्रवास भत्ते, वित्तीय देयके यासह इतरही काही देयके १५ मार्चपर्यंतच सादर करण्यास सर्व विभागांना कळविले आहे. यामुळे ‘मार्च एन्डिंग’च्या धावपळीवर काही अंशी पायबंद बसणार आहे.

विविध योजना, प्रकल्प आणि इतरही शासकीय खर्चासाठी सरकारकडून वर्षभर टप्प्या टप्प्याने अनुदान त्यात्या विभागासाठी कोषागार कार्यालयात पाठविले जाते. मात्र वेळेत देयके सादर न करण्यात येत असल्याने त्याची उचल होत नाही. मार्च महिन्यात एकदम सर्व विभागांकडून त्यांच्या शिल्लक अनुदानाच्या खर्चाची देयके कोषागारात पाठिवली जातात. ती मंजूर करण्याचा भार या कार्यालयावर येतो. नागपूर जिल्हा कोषागार कार्यालयात दरवर्षी देयके मंजूर करण्यासाठी मार्च महिन्याच्या शेवटच्या आठवडय़ात एकच गर्दी होते.  या काळात येणाऱ्या देयकांची संख्या ही तिप्पटीने वाढते, त्यामुळे संपूर्ण यंत्रणात कोलमडून पडते. ३० मार्च,३१ मार्चला तर रात्री उशिरापर्यंत देयके स्वीकारली जातात आणि ते मंजूर करण्याचे कामही उशिरापर्यंत सुरू राहते. शेवटच्या आठवडय़ात मंजूर होणाऱ्या देयकांची रक्कम ही काही अब्ज रुपयांपर्यंत जाते या वरून मार्चच्या अखेरच्या आठवडय़ात मंजुरीसाठी येणाऱ्या देयकांच्या संख्येचा आकडा लक्षात येऊ शकतो. ही गर्दी कमी करण्यासाठी वित्त विभागाने काही पावले उचलली आहे. त्यानुसार प्रवास भत्ते, आस्थापना विषयक पुरवणी देयके, वित्तीय प्रतिपूर्तीची देयके १५ मार्चपर्यंतच स्वीकारली जाणार आहेत. त्याच प्रमाणे पुरवणी मागण्या तसेच सुधारित अंदाजानुसार मंजूर करण्यात आलेल्या अनुदानाची देयकेही याच काळात सादर करावी लागणार आहे. यानंतर ती स्वीकारली जाणार नाही.

सहाय्यक कोषागार अधिकाऱ्यांच्या एकूण पाच जागा आहेत, त्यापैकी तीन रिक्त आहेत, एक महिला अधिकारी प्रसुती रजेवर आहे. त्यामुळे एकाच सहाय्यक कोषागार अधिकाऱ्यावर सध्या काम चालू आहे. बहुतांश विभागाचा वर्षभारातील खर्च हा याच महिन्यात प्रामुख्याने केला जातो, त्यामुळे एकाच वेळी देयकांची गर्दी होते. देयके मंजूर करण्यासाठी पुरेसा वेळ मिळत नाही, हे येथे उल्लेखनीय.