•  विषाणू प्रयोगशाळा पंधरा दिवसांत
  •   उपराजधानीत १० नवीन संशयित

 

नागपूर : उपराजधानीत करोनाग्रस्तांवर उपचारासाठी अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्था (एम्स) पुढे सरसावली आहे. त्यांनी तातडीने येथे १०० आयसोलेशन खाटा कार्यान्वीत करण्याची तयारी जवळपास पूर्ण केली आहे. या रुग्णांची तपासणी करण्यासाठी येथे अद्ययावत विषाणू प्रयोगशाळाही येत्या १० ते १५ दिवसांत कार्यान्वित होणार आहे. दुसरीकडे शहरात बुधवारी दिवसभरात करोनाचे १० संशयित रुग्ण दाखल करण्यात आले.

उपराजधानीत आजपर्यंत ४ करोनाचे रुग्ण आढळले आहेत. नवीन रुग्ण आढळले नसले तरी करोनाच्या संशयितांची संख्या वाढत आहे. दरम्यान, महाराष्ट्रासह देशात हे रुग्ण वाढत असल्याने विदर्भातही हे रुग्ण वाढण्याचा अंदाज वर्तवला जात आहे. पण, ते वाढू नये म्हणून जिल्हा प्रशासन खूप मेहनत घेत आहे. या रुग्णांवर उपचारासाठी खाटा कमी पडू नये म्हणून एम्सने तातडीने त्यांच्या मिहान परिसरातील वास्तूत १०० खाटांचे स्वतंत्र आयसोलेशन वार्ड तयार करून ते कार्यान्वित करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. येथे या रुग्णांच्या नमुन्यांच्या तपासणीसाठी व्हायरल रिसर्च अ‍ॅन्ड डायग्नोस्टिक लेबॉरेटरीही कार्यान्वित करण्याची प्रक्रिया सुरू आहे. या प्रयोगशाळेसाठी यंत्राची खरेदी झाली असून ती देशात लॉकडाऊन जाहीर झाल्यावर अडकून पडली आहे. परंतु प्रशासनान ही अडचण तातडीने दूर करून यंत्र तातडीने नागपुरात आणण्याच्या प्रक्रियेला गती दिली आहे. हे यंत्र येताच येथील वास्तूत ती तातडीने लावून पुण्याच्या राष्ट्रीय विषाणू प्रयोगशाळेकडून त्याचे निरीक्षण होईल. त्यानंतर येत्या १० ते १५ दिवसांत त्यावर तपासणी सुरू करण्याचा एम्स प्रशासनाचा प्रयत्न आहे. या प्रयोगशाळेमुळे मध्य भारतात करोनाशी संबंधित रुग्णांचे नमुने तपासण्याची क्षमता वाढण्यास मदत होईल. मेयोच्या प्रयोगशाळेत सध्या २४ तासात ८० ते ९० नमुनेच तपासले जातात. परंतु येथे अद्ययावत यंत्र असल्याने याहून अधिक नमुने तपासता येणार आहे. येथे स्वाईन फ्लूसह इतरही नमुन्यांची तपासणी आता शक्य होईल. दरम्यान बुधवारी दिवसभऱ्यात मेयोला विदेश  प्रवासाचा इतिहास असलेल्यांसह प्रत्यक्ष रुग्णाच्या संपर्कात आलेल्या सात संशयित रुग्णांना दाखल केले गेले. मेडिकलमध्ये तीन रुग्णांना दाखल केले गेले. या सगळ्यांचे नमुने तपासण्यासाठी मेयोतील प्रयोगशाळेत पाठवले असून त्यांच्या अहवालावरूनच त्यांच्या आजाराची माहिती स्पष्ट होईल.  एम्समध्ये मास्क, व्हेंटिलेटरसह इतरही अत्यावश्यक वस्तू तातडीने खरेदीची प्रक्रिया सुरू असून हा वार्ड येत्या काही दिवसांत सुरू करण्याचा प्रशासनाचा प्रयत्न असल्याचे एम्सच्या संचालिका डॉ. विभा दत्ता यांनी लोकसत्ताला सांगितले.

घरात विलगीकरणातील ७९२ जणांवर लक्ष

विदेश प्रवासाचा इतिहास असलेल्या प्रत्येक व्यक्तींसह करोना विषाणूची लागण झालेल्या, परंतु करोना तपासणी अहवाल नकारात्मक आलेल्या ७९२ व्यक्तींना खबरदारी म्हणून त्यांच्या घरातच विलगीकरणात ठेवले गेले आहे. विदेशातून आलेल्या १६५ जणांना आमदार निवासात खबरदारी म्हणून ठेवण्यात आले आहे. या सगळ्यांच्या आरोग्यावर आरोग्य विभागाकडून बारीक लक्ष ठेवले जात आहेत. दुसरीकडे आमदार निवासातून १४ दिवस निरीक्षण पूर्ण झाल्यावर एकही करोनाचे लक्षण आढळले नसल्याने १४ जणांना तर घरात विलगीकरणात असलेल्या ४७ जणांना हा आजार नसल्याचे सांगत त्यांना आरोग्य विभागाने मुक्त केले आहे.