राज्य शासनाने १३ कोटी वृक्ष लागवड मोहिमेअंतर्गत नागपूर महापालिकेने एक लाख वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट घेतले आहे. ५ जून अर्थात पर्यावरणदिनी आयुक्तांसह महापालिकेचे सर्व अधिकारी, कर्मचारी प्रत्येकी पाच याप्रमाणे शहरातील नदीकाठांवर सुमारे ६० हजार बांबू आणि आजच्या  रोपटय़ांची लागवड करणार आहे. पदाधिकारी, नगरसेवकही यामध्ये सहभागी होणार असून या अभिनव उपक्रमाच्या तयारीचे निर्देश आयुक्त वीरेंद्र सिंह यांनी दिले.

आयुक्त वीरेंद्र सिंह यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली. नदीकाठावर बांबू आणि आजनच्या झाडांची लागवड करण्याची संकल्पना आयुक्त वीरेंद्र सिंह यांनी मांडली. शासकीय वृक्ष लागवड मोहिमेत एक लाख वृक्षांचे उद्दिष्ट असले तरी त्याव्यतिरिक्त नवा उपक्रम म्हणून नागपुरातील नाग नदी, पिवळी नदी आणि पोरा नदी या तीनही ठिकाणी एकाच दिवशी, एकाच वेळी वृक्षारोपण केले जाईल. झोननिहाय या कार्यक्रमाचे नियोजन करण्यात येत असून नदीचे संपूर्ण नदीच्या पात्रात वृक्षारोपण करण्यात येणार आहे. नदी ज्या भागातून जाते, त्या भागातील प्रभागातील नगरसेवक, पदाधिकारी सुद्धा प्रशासनातर्फे या कार्यक्रमात आमंत्रित करण्यात येणार आहे.

महापालिकेतील प्रत्येक पदाधिकारी, प्रत्येक नगरसेवक, प्रत्येक अधिकारी, प्रत्येक कर्मचारी आणि प्रत्येक सफाई कामगारसुद्धा यामध्ये सहभागी होईल. बांबू आणि आजनची वृक्ष लावण्यामागचा उद्देश असा की या झाडांना कुठलेही जनावरे खात नाही. त्यामुळे यांना ट्री गार्डची आवश्यकता पडणार नाही. नदीच्या तीरावर गाळ थांबवण्याचे कार्य ही वनस्पती करेल आणि या झाडांमुळे नदी तीराचे सौंदर्यही खुलेल. या संपूर्ण उपक्रमाच्या तयारीचा ३ जूनला आाढावा घेण्यात येणार असल्याचे आयुक्तांनी सांगितले.