प्रकाश बाबा आमटे यांचे प्रतिपादन

अनेक वर्षे गडचिरोली जिल्ह्य़ातील आदिवासींसोबत घालवली. त्यांची जीवनशैली, कायदे सर्वच वेगळे असले तरी शहरातील सुशिक्षित नागरिकांच्या तुलनेत ते अधिक प्रगत विचाराचे वाटतात, असे प्रतिपादन लोकबिरादरीचे प्रमुख प्रकाश बाबा आमटे यांनी व्यक्त केले.

हायकोर्ट बार असोसिएशनतर्फे आयोजित ‘द रोड लेट ट्रॅव्हल्ड’ या उपक्रमांतर्गत मॅगासेसे पुरस्कार विजेते व ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते डॉ. प्रकाश बाबा आमटे आणि डॉ. मंदाकिनी प्रकाश आमटे यांची प्रकट मुलाखत सोमवारी पार पडली. यावेळी ते बोलत होते. यावेळी प्रकाश आमटे यांनी त्यांच्या सामाजसेवेचा प्रवास उलगडला.

आदिवासी समुदायाचे स्वत:चे वेगळे कायदे आहेत. अंग झाकायला कापड व खायला अन्न नसताना ते न्यायालयात दाद मागू शकत नाही. पोलिसांकडे गेले तर ते दोन्ही बाजूच्या लोकांना लुटतात. न्यायालयात वर्षांनुवष्रे प्रकरणे प्रलंबित राहतात. अशा परिस्थितीत आदिवासी गावातच पंचासमक्ष आपल्या समस्या सोडवतात.

एकदा एक तरुणी विवाहापूर्वीच गर्भवती राहिली. त्यावेळी तिने जबाबदार असलेल्या व्यक्तीचे नाव सांगितले. पंचासमक्ष सुनावणी झाली. पंचांनी त्या तरुणाला विवाह करण्यास सांगितले. पण, तो तयार नव्हता. मात्र, पीडित तरुणीची अब्रू गेली असून तिच्या पोटातील बाळासाठी पंचांनी १९७६ मध्ये तरुणाला शंभर रुपयांचा दंड ठोठावला. तरुणीने न्यायदान मान्य केले. त्यानंतर गावातील दुसरा तरुण तिच्याशी त्या अवस्थेत विवाह करण्यास तयार झाला. अशा अनेक घटना तेथे घडतात व त्या न्यायालयापर्यंत येत नाहीत. शहरात बलात्कार पीडित तरुणींना कुणी स्वीकारत नाही. मात्र, आदिवासी समुदायात तसे नाही. यावरून सुशिक्षितांपेक्षा आदिवासी अधिक प्रगत विचाराचे, पुरोगामी असल्याचे दिसून येते, असे  प्रकाश आमटे म्हणाले.

लहानपणापासून वडिलांचा वारसा पुढे न्यायचा, असेच ध्येय होते. एक दिवस त्यांच्यासोबत  सहलीकरिता भामरागडला गेलो. त्यावेळी आनंदवनमधून भामरागडला पोहोचायला तीन दिवस लागले. त्या भागातील परिस्थिती बघून तेथील आदिवासींकरिता काम करण्याची इच्छा व्यक्त केली. वैद्यकीय शिक्षण पूर्ण झाल्यानंतर भामरागड परिसरात जागा मिळण्यासाठी सरकारकडे अर्ज केला. मात्र, सरकारकडून लवकर उत्तर न मिळाल्याने पदव्युत्तर शिक्षणासाठी प्रवेश घेतला. तेथे डॉ. मंदाकिनी यांच्याशी भेट झाली व प्रेम झाले.

यावेळी सर्वोच्च न्यायालयाचे सेवानिवृत्त न्या. विकास सिरपूरकर व वरिष्ठ अधिवक्ता कुमकुम सिरपूरकर यांच्या हस्ते आमटे दाम्पत्याचा शाल, श्रीफळ व सन्मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला, तर एचसीबीएतर्फे अध्यक्ष अ‍ॅड. अनिल किलोर, सचिव प्रफुल्ल खुबाळकर आणि उपाध्यक्ष गौरी व्यंकटरमन यांच्या हस्ते त्यांना दीड लाख रुपयांचा धनादेश प्रदान केला. निवेदिका श्वेता शेलगांवकर यांनी आमटे दाम्पत्याची मुलाखत घेतली.

‘नदी काठावर मतभेदांना विराम’

शिक्षण अपूर्ण सोडल्यानंतर डॉ. प्रकाश यांच्याशी कडाक्याचे भांडण झाले होते. भांडण प्रत्येक जोडप्यात होतात. याला आम्हीही अपवाद नव्हतो.  मात्र, हेमलकसा येथे काम करताना दोन तीन झोपडय़ांमध्ये राहताना आम्ही कधीच भांडलो नाही. कारण, झोपडीतून आवाज दुसऱ्यांना जाईल व घरातील भांडण रस्त्यांवर आणायचे नव्हते. त्यामुळे मतभेद निर्माण झाल्यानंतर आम्ही नेहमी सकाळी व सायंकाळी शेजारच्या नदीवर पायी फिरायला जात होतो. नदीच्या दिशेने चालत जाताना जंगलात जेवढं एकमेकांना बोलायचे ते बोलून मोकळे होत होतो. घरी परतण्यापूर्वी सर्व मतभेद सोडवले जात होते. आता सकाळ व सायंकाळी नदीवर फिरायला जाण्याची सवयच झाली, असे डॉ. मंदाकिनी आमटे यावेळी म्हणाल्या.