वाघ वाचविण्याबाबत जागृतीसाठी प्रतीकात्मक संदेश

माणूस माणसांप्रतीच नाही तर प्राण्यांप्रतीसुद्धा तेवढाच संवेदनशील असतो. वर्षांच्या अखेरीस उमरेड-करांडला अभयारण्यात झालेला दोन वाघांचा मृत्यू तेथील रिसॉर्टचालकांना आणि पर्यटक मार्गदर्शकांनासुद्धा चटका लावून गेला. म्हणूनच या अभयारण्याची शान राहिलेल्या ‘चार्जर’ आणि ‘राई’ या दोन्ही वाघांच्या श्रद्धांजली आणि ‘तेराव्या’चा कार्यक्रम आखला आहे.

रविवारी दुपारी १२.३० वाजता अभयारण्याच्या पवनी प्रवेशद्वारावर त्यांना श्रद्धांजली आणि ‘तेराव्या’चा कार्यक्रम आयोजित केला आहे.

नवेगाव-नागझिरा व्याघ्र प्रकल्पातून स्थलांतर करुन आलेल्या ‘जय’ या वाघामुळे उमरेड-करांडला अभयारण्य जागतिक पर्यटन नकाशावर आले. हा वाघ बेपत्ता झाला आणि अभयारण्याकडे पर्यटकांनी पाठ फिरवली. मात्र, ‘जय’ चे बछडे  ‘चार्जर’ आणि ‘राई’ यांनी पुन्हा पर्यटकांना या अभयारण्यात येण्यास भाग पाडले. या वाघांमुळेच अनेकांना रोजगार मिळाला. अनेकांच्या घरातील चुली पेटल्या. मात्र, गावकऱ्यांनी त्याची सकारात्मक बाजू पाहिली नाही. केवळ त्याच्यामुळे आमचे नुकसान झाले, एवढीच बाजू त्यांनी लक्षात ठेवली. कधी वीजप्रवाहाच्या माध्यमातून तर कधी विष देऊन वाघांना मारले.

गावकऱ्यांना त्यांच्या चुकीची जाण व्हावी आणि जनमानसात वाघांविषयी जागृती निर्माण व्हावी म्हणून पवनी येथील ‘टायगर डेन रिसॉर्ट’चे संचालक प्रसाद इंगळे तसेच पर्यटक मार्गदर्शक छगन डहारे, पंकज तलमले, नामदेव बोडखे, दिनेश डहारे आदींनी या कार्यक्रमाची आखणी केली आहे.

वन्यप्राणी स्वत:हून गावात कधीच शिरत नाही. वाघांनी केलेले ९९ टक्के हल्ले हे त्याच्या अधिवासात माणूस शिरल्यामुळे झाले आहेत. एक टक्का प्रकरणात वाघाने गावात येऊन हल्ला गेला आहे. जंगल आणि वाघ वाचला तरच माणूस वाचणार आहे. गावकऱ्यांना वाघांमुळे  रोजगार मिळाला असताही त्यांनी  वाघ मारले तर रोजगार नाहीसा होईल. . ही जाणीव गावकऱ्यांना करुन देण्यासाठी प्रतिकात्मक स्वरुपात ‘चार्जर’ आणि ‘राई’ या दोन्ही वाघांच्या श्रद्धांजली व ‘तेराव्या’च्या कार्यक्रमाची आखणी केली आहे.

– प्रसाद इंगळे, संचालक, टायगर डेन रिसॉर्ट पवनी