तामिळनाडूच्या मुख्यमंत्री जयललिता यांना विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहांनी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करून दिवसभराचे कामकाज तहकूब केले.

विधान परिषदेचे कामकाज सुरू झाल्यावर सभापती रामराजे निंबाळकर यांनी शोक प्रस्ताव मांडला, त्यावर सभागृहाचे नेते व महसूलमंत्री चंद्रकांत दादा पाटील, विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे, हेमंत टकले, काँग्रेसचे गटनेते शरद रणपिसे, नारायण राणे, शिवसेनेच्या नीलम गोऱ्हे आणि अपक्ष कपील पाटील यांनी त्यांच्या शोकसंवेदना व्यक्त केल्या.

धनंजय मुंडे म्हणाले की, जयललिता या तामिळनाडूच्या गोरगरीब जनतेच्या खऱ्या अर्थाने ‘अम्मा’ होत्या. त्यांना मिळालेले जनतेचे प्रेम फार कमी राजकीय नेत्यांच्या वाटय़ाला येते. त्यांनी कायम त्या प्रदेशातील सामान्यांच्या हिताचा विचार करून राजकारण केले. त्यांच्यावर टीकाही झाली, पराभवही वाटय़ाला आला, पण न डगमगता त्यांनी परिस्थितीशी संघर्ष केला. त्यांच्यातील लढाऊ वृत्ती आजारपणाशी संघर्ष करतानाही दिसून आली.

नीलम गोऱ्हे यांनी त्यांचा उल्लेख ‘रणरागिणी’ असा केला. राजकारणात महिलांना मुख्यमंत्रिपदापर्यंत मजल मारताना अनेक संकटांना तोड द्यावे लागते, अशा अडचणींना त्यांनाही सामोरे जावे लागले. मात्र, त्या विरोधकांना पुरून उरल्या. चित्रपट अभिनेत्री ते राज्याच्या मुख्यमंत्री, असा त्यांचा राजकीय प्रवास थक्क करणारा आहे. राज्याचे राजकारण करताना त्यांनी राष्ट्रीय राजकारणावरही आपला प्रभाव कायम ठेवला. अनेक बाबतींत त्यांचे निर्णय वादग्रस्त ठरले, पण त्यावर त्या कायम राहिल्या.

शरद रणपिसे यांनी त्यांचा उल्लेख लढाऊ नेत्या, असा केला. ‘अम्मा’ या नावाने त्यांनी गोरगरिबांसाठी अनेक योजना सुरू केल्या. नारायण राणे म्हणाले की, त्या खऱ्या अर्थाने ‘आयर्न लेडी’ होत्या. नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत पुन्हा सत्तेवर येऊन त्यांनी जनतेवर असलेली आपली पकड किती घट्ट आहे, हे दाखवून दिले. कपील पाटील यांनी जयललिता यांच्या राजकीय कार्यक र्तृत्वाची महती विशद केली.

जनतेसाठी झटणाऱ्या नेत्या

तामिळनाडूच्या मुख्यमंत्री जयललिता यांना श्रद्धांजली अर्पण करून विधानसभेचे कामकाज मंगळवारी दिवसभरासाठी तहकूब करण्यात आले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शोक प्रस्ताव मांडल्यावर काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शेतकरी कामगार पक्षांनी त्याला पाठिंबा दिला.

बहुप्रतिभा आणि जनतेच्या त्या नेत्या होत्या. त्यांनी एम.जी. रामचंद्रन यांच्या निधानानंतर पक्षांतर्गत विविध गटांना एकत्र करून राजकारणात अमिट छाप उमटवली, असे फडणवीस शोक प्रस्तावावर बोलताना म्हणाले. काँग्रेसच्या वतीने श्रद्धांजली वाहताना पतंगराव कदम म्हणाले, त्या लोकाभिमुख निर्णय घेणाऱ्या नेत्या होत्या. एकीकडे उद्योगपतींचे कर्ज माफ होत असताना सामान्यांना दिलासा देणाऱ्या त्या नेत्या होत्या, असा चिमटा राष्ट्रवादीचे अजित पवार यांनी काढला. त्या गोरगरिबांसाठी झटणाऱ्या नेत्या होत्या. त्यांच्या जाण्याने देशाच्या राजकारणाचे मोठे नुकसान झाले, असे शेकापचे गणपतराव देशमुख म्हणाले. त्या अतिशय लोकप्रिय मुख्यमंत्री होत्या. त्या मुख्यमंत्री म्हणून केवळ एक रुपया वेतन घेत असत. त्यांनी तामिळ अस्मिता जपण्याचा आटोकाट प्रयत्न केला. जनतेची नस त्यांनी जाणली होती, या शब्दात शिवसेनेचे एकनाथ शिंदे यांनी श्रद्धांजली वाहिली.