मुख्यमंत्र्यांची माहिती

गुन्हेगारांच्या इत्थंभूत माहिती गोळा करण्यासाठी सीसीटीएनएससोबत आधार क्रमांक जोडण्याचा प्रयत्न असून त्यासाठी केंद्र सरकारकडून परवानगी मागण्यात आली आहे. त्यामुळे यानंतर ‘कानून के हाथ लंबे ही नही, बहोत लंबे’ होतील, असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला.

सीसीटीएनएसमुळे देशभरातील सर्व गुन्ह्य़ांची माहिती ऑनलाईन उपलब्ध आहे. त्यामुळे कोणत्याही व्यक्तिसंदर्भात माहिती मिळवायची असल्यास सीसीटीएनएसवर एक नाव टाकले तर त्याने देशभरात किती गुन्हे केले, याची माहिती मिळेल. त्यावर आधार जोडण्यात आल्यास हाताचे ठसे आणि बायोमेट्रिक माहिती उपब्लध होईल. त्यामुळे आरोपी शोधणे अधिक सोपे होईल. कोणताही आरोपी पोलिसांपासून अधिक काळ पळू शकणार नाही, असेही ते म्हणाले. आपण नागपूरकर मुख्यमंत्री असल्याने नागपुरात कोणताही गुन्हा घडला तरी त्याची राष्ट्रीय बातमी होते. माध्यमांचे चुकीचे दाखवणे काम आहे. मात्र, आता नागपूर पोलिसांची कामगिरी उंचावली असून तेही माध्यम दाखवितात, याचा आनंद त्यांनी व्यक्त केला. पासपोर्ट चारित्र्य पडताळणी कालावधी कमी होण्यासाठी प्रयत्न सुरू असताना नागपूर पोलिसांनी प्रथम ६ ते ७ दिवसांत चारित्र्य पडताळणी करावे आणि त्यानंतर २४ तासांत ते काम व्हायला हवे, यासाठीही पोलिसांनी प्रयत्न करायला हवे, असे मुख्यमंत्री म्हणाले.

नागपूरकरांच्या पोलिसांकडून असलेल्या अपेक्षा आणि त्या अपेक्षांवर नागपूर पोलीस किती खरे उतरले, हे जाणून घेण्यासाठी नागपूर पोलिसांनी तिरपुडे व्यवस्थापन महाविद्यालयाकडून सर्वेक्षण करून घेतले.

या सर्वेक्षणात शहरातील प्रत्येक पोलीस ठाण्याच्या हद्दीतील किमान २०० लोकांचे मत जाणून घेण्यात आले. त्या आधारावर नागपूर पोलिसांनी अहवाल तयार करून रविवारी पर्सिस्टन्टच्या सभागृहात मुख्यमंत्र्यांना सादर करण्यात आला, त्यावेळी ते बोलत होते.

यावेळी पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे उपस्थित होते. नऊ मुद्यांवर पोलिसांची कामगिरी आनंद देणारी आहे. मात्र, सोबतच अधिक काम करण्यासाठी प्रवृत्त करणारीही आहे. लोकांच्या अपेक्षा १०० टक्के पूर्ण करता येऊ शकत नाही, ही अपेक्षा असताना अधिकाधिक अपेक्षा कशा पूर्ण करता येईल, यासाठी प्रशासनाचे प्रयत्न असतील, असा विश्वास पोलीस आयुक्त डॉ. के. व्यंकटेशम यांनी दिला. यावेळी चांगले कार्य करणारे पोलीस ठाणे, उपायुक्त, सहाय्यक आयुक्त आणि इतर कर्मचाऱ्यांना प्रशस्तीपत्र देऊन गौरविण्यात आले. संचालन उपायुक्त राहुल माकणीकर यांनी केले. प्रास्ताविक सहाय्यक आयुक्त अश्विनी पाटील यांनी, तर आभार सहपोलीस आयुक्त शिवाजी बोडखे यांनी मानले.

सर्वेक्षणाचा नागपूर पॅटर्न राज्यात राबवणार

नागपूर पोलिसांनी विविध मुद्यांवर तयार केलेल्या तुलनात्मक अहवालावरून पोलिसांच्या कामगिरीत लक्षणीय वाढ झाल्याचा निष्कर्ष पुढे आला आहे. याच धर्तीवर राज्यातील इतर प्रमुख शहरातही जनतेच्या पोलिसांबाबत अपेक्षा आणि आकलनासंदर्भात सर्वेक्षण केले जाईल, असे मुख्यमंत्र्यांनी जाहीर केले.