नागपूर महापालिकेचे आयुक्त तुकाराम मुंढे यांनी गुरूवारी अधिकारी, कर्मचाऱ्यांना फैलावर घेतलं. शिवजयंती निमित्त आयोजित कार्यक्रमात एका कर्मचाऱ्याचा फोनची रिंग वाजल्यानंतर आयुक्त मुंढे संतापले. त्यानंतर त्यांनी अधिकारी कर्मचाऱ्यांचा वर्ग घेत सगळ्यानांच सुनावलं.

नागपूर महापालिकेत काही दिवसांपूर्वी तुकाराम मुंढे यांची बदली करण्यात आली. तेव्हापासून मुंढे यांनी कर्मचाऱ्यांना शिस्त लावण्याचं काम हाती घेतलं आहे. आयुक्त पदाचा भार स्वीकारणाऱ्या मुंढेंनी पहिल्याच दिवशी अधिकाऱ्यांची बैठक घेऊन सूचना केल्या होत्या. त्यानंतर गुरूवारी मुंढे यांनी अधिकारी कर्मचाऱ्यांना खडसावलं.

शिवजयंती निमित्त नागपूर महापालिकेत अभिवादनाचा कार्यक्रम पार पडला. यावेळी कार्यक्रमात एका कर्मचाऱ्याच्या मोबाईलची रिंग वाजली. अचानक मोबाईल वाजल्यानं मुंढे यांनी वर्ग घेत कर्मचाऱ्यांना फैलावर घेतलं. विशेष म्हणजे जिन्स घालून आलेल्या एका कर्मचाऱ्यालाही मुंढे यांनी सुनावलं.

नागपूरमध्येही मुंढे चर्चेत –

नागपूर महापालिकेत सध्या भाजपाची सत्ता आहे. त्यात तुकाराम मुंढे हे आयुक्तपदी आल्यानंतर भाजपाचे नगरसेवक नाराज आहेत. मंजूर विकास कामांना स्थगिती दिल्याचा ठपका ठेवत भाजपा नगरसेवकांनी तुकाराम मुंढेविरोधात नाराजीचा सूर लावला आहे. यासंदर्भात भाजपाच्या १०९ नगरसेवकांनी मुंढे यांची भेट घेण्याचा प्रयत्न केला. त्यावर मुंढेंनी १५ मिनिटांचा वेळ दिला. त्यात अनेक नगरसेवकांना बसण्यासाठी खुर्च्याही नव्हत्या, असं सांगत नगरसेवकांनी मुंढेंविषयी तक्रारी पाढाच वाचला आहे.