महापालिका कर्मचाऱ्यांनीच फलक लावल्याची चर्चा

नागपूर : आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या वाढदिवसाच्या दिवशी महापालिका कार्यालयात त्यांना शुभेच्छा देणारा फलक लावण्यात आला. मुंढे यांनी हा फलक काढायला लावला असला तरी तो लावला कोणी आणि त्यांच्यावर मुंढे कारवाई करणार का, याकडे आता लक्ष लागले आहे.

मुंढे नेहमीच्या दिनक्रमाप्रमाणे बुधवारी सकाळी साडेनऊ च्या सुमारास  कार्यालयात दाखल झाले. त्यांची नजर प्रवेशद्वारासमोरील शेजारी असलेल्या भिंतीकडे गेली. येथे त्यांना मोठे फलक दिसले. आम्ही नागपूरकर नागरिक तुमच्या पाठीशी उभे आहोत, असे या फलकावर लिहिले होते. मुंढे यांनी  सुरक्षा रक्षकांना तो फलक काढण्याची सूचना केली.

विशेष म्हणजे, महापालिका सार्वजनिक ठिकाणी लावलेल्या फलकावर कारवाई करते. आता खुद्द आयुक्तांनाच शुभेच्छा देणारा फलक महापालिका कार्यालयात लावण्यात आला. त्यामुळे  आता हा फलक लावणाऱ्याचा शोध घेऊन सबंधितांवर कारवाई होईल का, असा प्रश्न उपस्थित झाला आहे. दरम्यान, हे फलक  लावण्याची कल्पना महापालिकेच्या काही अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची असल्याची चर्चा आहे.

अ‍ॅपवरील तक्रारींचे सात दिवसात निराकरण करा

‘नागपूर लाईव्ह सिटी’ अ‍ॅप नागरिकांना केंद्रबिंदू ठेवून तयार करण्यात आले आहे. २४ तासांच्या आत तक्रार  ‘ओपन’ करून सात दिवसांच्या आत तिचे निराकरण आवश्यक आहे. अधिकाऱ्यांनी नागरिकांच्या तक्रारींना सर्वोच्च प्राधान्य द्यावे, असे  निर्देश आयुक्त तुकाराम मुंढे यांनी दिले. नागरिकांना घरबसल्या त्यांच्या स्मार्ट फोनवरून तक्रार करता यावी, यासाठी महापालिकेने  ‘नागपूर लाईव्ह सिटी’ अ‍ॅप तयार केले आहे. या अ‍ॅपच्या संचालनासंदर्भात तक्रारींचा लवकर निपटारा करता यावा, यासाठी अधिकारी आणि विभाग प्रमुखांना प्रशिक्षण देण्यात आले. याप्रसंगी अधिकाऱ्यांशी संवाद साधताना मुंढे बोलत होते. यावेळी अतिरिक्त आयुक्त राम जोशी, संजय निपाने, उपायुक्त निर्भय जैन, सुभाष जयदेव, डॉ. रंजना लाडे यांच्यासह सर्व विभागप्रमुख उपस्थित होते.