महापालिकेची शनिवारी झालेली सभा अपेक्षेप्रमाणे वादळी ठरली. नगरसेवकांकडून होणाऱ्या टीकेने संतापलेले आयुक्त तुकाराम मुंढे हे सभा अध्र्यावर सोडून निघून गेले. महापालिकेच्या इतिसाहात ही दुर्दैवी घटना असल्याचे सांगत आयुक्तांच्या या वर्तणुकीचा सत्ताधाऱ्यांसह विरोधकांनीही निषेध केला. सभागृहाच्या आत असा आयुक्तविरुद्ध नगरसेवक असा संघर्ष सुरू असताना सभागृहाबाहेर मात्र काही संघटनांनी मुंढेंच्या समर्थनार्थ जोरदार घोषणाबाजी केली.

सभेला दोन तास उशिरा सुरुवात झाली. शोक व अभिनंदन प्रस्ताव मांडल्यानंतर प्रश्नोत्तराच्या तासाला सुरुवात झाली. काँग्रेसचे हरीश ग्वालबंशी यांनी बांधकाम नकाशे मंजुरीचा प्रश्न उपस्थित केला. त्यावर  अधिकाऱ्यांना समाधानकारक उत्तर देता आले नाही. त्यामुळे आयुक्त या प्रश्नावर बोलायला लागले. याचवेळी भाजपाचे ज्येष्ठ नेते दयाशंकर तिवारी यांनी माहिती हरकतीचा मुद्दा उपस्थित केला. मात्र त्यांना बोलू देण्यात आले नाही. त्यामुळे तिवारी आयुक्तांवर भडकले. महापौरांनी मध्यस्थी करत त्यांना शांत केले. त्यानंतर लगेच हरीश ग्वालबंशी यांनी तुकाराम मुंढे यांच्या कार्यशैलीवर वैयक्तिक टीका केली. यामुळे संतापलेल्या आयुक्तांनीकाही न बोलता सभागृह सोडले. आयुक्त नसल्यामुळे पंधरा मिनिटासाठी सभागृह स्थगित करण्यात आले. दरम्यान, अतिरिक्त आयुक्त राम जोशी आणि महापौर संदीप जोशी यांनी तुकाराम मुंढे यांच्याशी  संवाद साधला. मात्र त्यांनी सभागृहात येण्यास नकार दिला, त्यामुळे  मंगळवापर्यंत सभा स्थगित करण्यात आली.

सभागृहात जर माझा सन्मान होत नसेल आणि माझ्यावर वैयक्तिक टीका केली जात असेल तर सभागृहात उपस्थित राहणे मला उचित वाटत नाही. सगळ्यांच्या प्रश्नांना उत्तरे देण्यास तयार आहे, मात्र वैयक्तिक टीका मी सहन करणार नाही.

– तुकाराम मुंढे, आयुक्त