तुकाराम मुंढे यांचा सज्जड दम; पहिल्याच दिवशी अधिकाऱ्यांची भंबेरी

नागपूर : माझ्या कार्यशैलीला घाबरू नका मात्र, प्रशासकीय सर्व कामे नियमात, शिस्तीने आणि वेगाने करा अन्यथा घरी जा, असा सज्जड दम नवनियुक्त आयुक्त तुकाराम मुंढे यांनी पहिल्याच दिवशी अधिकाऱ्यांना दिला. अधिकारी आणि विभाग प्रमुखांची बैठक घेत विविध विभागांच्या विकासकामांचे सादरीकरण दोन दिवसात करण्याचे निर्देश त्यांनी दिले. यामुळे पहिल्याच दिवशी अधिकाऱ्यांची भंबेरी उडाली.

मुंढे येणार या धास्तीने गेल्या पाच दिवसांपासून महापालिकेतील अनेक अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या चेहऱ्यावर स्पष्ट भीती दिसत  होती. मंगळवारी सकाळी सव्वानऊ वाजता मुंढे महापालिकेत येऊन धडकले.  त्यांनी कक्षात प्रवेश करताच शेजारच्या टेबलवर धूळ  होती. त्यांनी कक्षाबाहेर असलेल्या एका कर्मचाऱ्याला बोलावले आणि हे काय म्हणून सुनावले.

दरम्यान, सर्व अधिकारी आयुक्तांच्या शेजारच्या सभागृहात बसले हाते, ९.३० वाजता बैठक सुरू झाली. जवळपास ५० मिनिटे चाललेल्या यांनी बैठकीत मुंढे यांनी एक एक करत प्रत्येक विभागाचे अधिकारी, झोनचे सहायक आयुक्त व विभाग प्रमुखांची ओळख करून घेतली. प्रत्येकाकडे कुठल्या जबाबदाऱ्या आहेत याची माहिती घेतली.

अधिकाऱ्यांशी संवाद साधताना मुंढे यांनी मला कार्यालयात शिस्त हवी. माझ्या कार्यशैलीची प्रत्येकाला माहिती आहे. मला नियमात काम हवे आणि ते होत नसेल तर लगेच सांगा. प्रत्येकाने कार्यालयात वेळेवर येणे अपेक्षित आहे. उशिरा आले तर कार्यालयात येऊच नका. प्रत्येक अधिकाऱ्याच्या कामाचा दररोजचा लेखाजोखा घेतला जाईल, असा सूचक इशाराही त्यांनी दिला.

नावाची पाटी दहा मिनिटांत बदलली

मुंढे महापालिकेत आले तेव्हा त्यांच्या कक्षाबाहेर आयुक्त अभिजित बांगर यांच्या नावाची पाटी होती. त्यामुळे मुंढे काही वेळ बाहेरच थांबले. त्यांनी लगेच सामान्य प्रशासनाच्या विभागाच्या अधिकाऱ्याला बोलावून तात्काळ नावाची पाटी बदलण्याचे निर्देश दिले. दहाव्या मिनिटाला मुंढे कक्षात गेल्यानंतर आवाज न करता दारावरील पाटी बदलून मुंढेंच्या नावाची पाटी लावली गेली. दरम्यान, ज्या कर्मचाऱ्याला कक्षाबाहेर पाटी लावण्याचे काम दिले होते त्याला तात्काळ नोटीस द्या, असे निर्देश त्यांनी दिले.

बैठकीत भ्रमणध्वनी   वाजायला नको!

अधिकाऱ्यांची बैठक सुरू असताना अधिकारी व सहायक आयुक्त वेळेच्या आधी येऊन बसले तर काही अधिकारी धावपळ करत बैठक सुरू झाल्यानंतर आले. त्यामुळे उशिरा आलेल्या अधिकाऱ्यांची नोंद करून ठेवा, असे निर्देश सहायक आयुक्तांना मुंढे यांनी दिले. बैठकीदरम्यान अनेक अधिकाऱ्यांचे मोबाईल वाजले. तेव्हा यानंतर बैठकीत ज्या अधिकाऱ्याचा मोबाईल वाजेल त्याने तात्काळ बैठकीतून  घरी जावे, असा इशारा मुंढे यांनी अधिकाऱ्यांना दिला.

आता आयुक्तांचा जनता दरबार

शहरातील नागरिकांच्या काही समस्या असतील तर त्यांना त्या थेट आयुक्तांसमोर मांडता येणार आहे. यासाठी कुठल्याही पूर्वपरवानगीची गरज नाही. नागरिकांना कार्यालयीन कामकाजाच्या दिवशी दुपारी ४ ते सायंकाळी ५ या वेळेत आयुक्तांना भेटून आपल्या समस्या व तक्रारी मांडता येणार आहेत. आयुक्तांचा हा जनता दरबार दररोज राहणार असून नागरिकांनी दरबाराच्या नियोजित वेळेत येण्याचे आवाहन महापालिका  मुंढे यांनी केले आहे.

ऐनवेळी ‘पंचिंग मशिन’मध्ये बिघाड

मुंढे महापालिकेत पदभार स्वीकारण्यासाठी येणार असल्याच्या भीतीने मंगळवारी सर्व अधिकारी, कर्मचारी वेळेत आले. मात्र नेमके त्याचवेळी कर्मचाऱ्यांच्या हजेरीच्या पंचिंग मशीनमध्ये बिघाड झाल्याने अनेकांची तारांबळ उडाली. वेळेवर हजेरी लागली नाही तर अनुपस्थिती लागेल, या भीतीने  अनेक कर्मचारी आपापल्या विभागात जाऊन बसले. मात्र काही वेळाने पंचिंग मशीन दुरुस्त करण्यात आली आणि कर्मचाऱ्यांनी लगेच येऊन हजेरी लावली.