दिवसभरात नवीन ३३ बाधितांची भर

नागपूर : सलग दुसऱ्या दिवशीही मध्यवर्ती कारागृहाशी संबंधित १२ नवीन व्यक्तींना करोनाची बाधा असल्याचे पुढे आले आहे. त्यामुळे आजपर्यंत येथील एकूण बाधितांची संख्या ६६ वर पोहचली आहे.  शहरात दिवसभरात कारागृहासह शहरातील इतर भागातील एकूण ३३ नवीन रुग्णांची भर पडली आहे.

एकूण बाधितांची संख्या थेट १,६११ वर पोहचली आहे. नवीन बाधितांमध्ये मध्यवर्ती कारागृहातील १ महिला जेलर, १० कर्मचारी आणि १ बाधित कर्मचाऱ्याच्या पत्नीचा समावेश आहे. याशिवाय नाईक तलाव ६, काटोल १, कामठी १, जळगाव १, तामिळनाडू १, इतवारी भाजी मंडी १, क्वेटा कॉलनी १, खासगी प्रयोगशाळेतील ३ जणांनाही करोनाची बाधा असल्याचे स्पष्ट झाले.

‘त्या’ रुग्णाकडून दुसऱ्यांदा रक्तद्रव्य घेण्यास नकार!

मेडिकलच्या कोव्हिड रुग्णालयात रक्तद्रव्य (कॉनव्हॅलसंट प्लाझ्मा) उपचाराचा पहिला टप्पा पूर्ण केलेल्या रुग्णाने आज गुरुवारी वेळेवर दुसऱ्यांदा रक्तद्रव्य घेण्यास नकार दिला. त्यामुळे मेडिकलची पहिलीच रक्तद्रव्य  चाचणी अर्धवट राहिली. हा गोंधळलेला रुग्ण प्रत्येकवेळी आपली भूमिका बदलत असल्याने मेडिकलचे डॉक्टरही त्रासले आहेत. १ जुलैला शहरातील पहिल्या रक्तद्रव्य चाचणीसाठी अमरावतीतील एक करोनाबाधित डॉक्टर तयार झाला होता. त्याला २०० एमएल रक्तद्रव्य बुधवारी देण्यात आले. नियमानुसार या रुग्णाला २४ तासात दुसऱ्यांदा पुन्हा २०० एमएल रक्तद्रव्य दिले जाते. त्यानुसार आज सर्व तयारी झाली असताना त्याने वेळेवर रक्तद्रव्य घेण्यास नकार दिला. वैद्यकीय चाचणीच्या नियमानुसार या प्रक्रियेसाठी रुग्णाची लेखी परवानगी हवी असते. परंतु रुग्णानेच नकार दिल्याने तो या चाचणीतून बाद झाला आहे. या उपचारासाठी एका दाणदात्याच्या रक्तातून ४५० एमएल रक्तद्रव्य घेतले जाते. मेडिकलच्या रुग्णाला पहिल्या टप्प्यात २०० एमएल रक्तद्रव्य दिले गेले. परंतु दुसरे २०० एमएल रक्तद्रव्य घेण्यास त्याने नकार दिले. आता हे रक्तद्रव्य प्रशासनाकडे  आहे. त्यातच वैद्यकीय निकषानुसार बधिताला एकाच रुग्णाचे रक्तद्रव्य दोन टप्प्यात दिले जाते. परंतु काही प्रकरणात दोन वेगवेगळ्या व्यक्तीचेही रक्तद्रव्य देता येते. परंतु दोन वेगवेगळ्या व्यक्तीचे रक्तद्रव्य दिल्यास काही अतिरिक्त जोखीमही संभवते. त्यामुळे हे रक्तद्रव्य कुणावर वापरणार की कसे, याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.

पहिल्या खासगी कोविड रुग्णालयाला मंजुरी

करोनाचे रुग्ण वाढत असताना नागपूर महापालिकासह जिल्हा प्रशासनाने प्रसंगी खासगी रुग्णालयांनी उपचारासाठी सज्ज राहत आवश्यक सुविधा उभारण्याच्या सूचना केल्या होत्या.  खासगीतील डॉक्टरांसह आरोग्य कर्मचाऱ्यांना करोनाबाबत प्रशिक्षित करण्यात आले होते. परंतु खासगी रुग्णालयांनी करोनाबाधितांवर उपचाराला नकार दर्शवला होता. आता वोक्हार्ट रुग्णालयाने पुढाकार घेत त्यांच्या गांधीनगर येथील रुग्णालयात ४५ खाटांची सोय करोनाबाधितांवर उपचारासाठी केली आहे. या प्रथम खासगी कोविड रुग्णालयाला प्रशासनाकडून मंजुरीही देण्यात आली आहे. या रुग्णालयात उपचार घेणाऱ्या रुग्णांना जास्त शुल्क लागू नये, चांगल्या सोयी मिळाव्या म्हणून विभागीय आयुक्त डॉ. संजीव कुमार यांनी प्रयत्न केले.

केवळ १४ करोनामुक्त

गुरुवारी दिवसभरात केवळ १४ जण करोनामुक्त झाले. त्यात मेडिकलचे ४ तर मेयोतील १० जणांचा समावेश आहे. त्यामुळे  आजपर्यंत करोनामुक्त झालेल्यांची संख्या १,३६१ वर पोहचली आहे.

नवीन सात परिसर बंद 

वाढत्या करोना संसर्गामुळे शहरात दिवसेंदिवस प्रतिबंधित क्षेत्रात वाढ केली जात आहे. गुरुवारी यात आणखी सात परिसरांची भर पडली. दरम्यान, सात परिसर  मुक्त करण्यात आले. दोन परिसराच्या प्रतिबंधित सीमा क्षेत्राच्या व्याप्ती वाढवण्यात आली. प्रतिबंधित मुक्त परिसरामध्ये  सतरंजीपुरा झोन – स्विपर कॉलनी लालगंज, विनाकी सोनार टोली, सतरंजीपुरा. – लक्ष्मीनगर झोन – बजाजनगर – धंतोली झोन – चंद्रमणीनगर – धरमपेठ झोन – धंतोली एस.के. बॅनर्जी मार्ग (पोस्ट ऑफिस)- गांधी झोन महाल व गांधीबाग कपडा मार्केटचा समावेश आहे.