नागपूर :  मेडिकलमध्ये गेल्या पंधरा वर्षांत दोन बालकांना मृत्यू प्रमाणपत्र दिल्यानंतर काही तासांनी ते जिवंत असल्याचे प्रकार पुढे आले आहेत. वैद्यकीय परिभाषेत याला सस्पेंडेड अ‍ॅनिमेशन किंवा तात्पुरती मृतावस्था म्हटले जाते. नुकतेच बडनेरातील एका दोन महिन्याच्या बालकाबाबत हा दुर्मिळ प्रकार घडला असून सध्या या मुलावर अमरावतीच्या खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

वैद्यकीय जनरलमधील दुर्मिळ नोंदीनुसार कमी वजनाच्या, कमी दिवसांच्या निवडक बालकांमध्ये विशेषत: थंडीच्या दिवसात श्वसन आणि हृदयाच्या ठोक्याची क्रिया पूर्णपणे बंद पडते. या प्रक्रियेत काही तासांनी बालकांमध्ये संवेदना जाणवायला लागतात. परंतु ही मुले वैद्यकीयदृष्टय़ा फार कमकुवत असतात. मेडिकलमध्ये सुमारे पंधरा वर्षांपूर्वी असेच मृत घोषित केल्यावर कुटुंबातील सदस्यांनी एका लहान बालकाला अंत्यसंस्कारासाठी घाटावर नेले. परंतु येथे मुलाने हालचाल केली. त्यानंतर तातडीने या मुलाला  रुग्णालयात हलवण्यात आले. या घटनेची बालरोग तज्ज्ञांकडून चौकशीही केली गेली.

वैद्यकीय जनरलमधील पडताळणीत शेवटी सस्पेंडेड अ‍ॅनिमेशन या अवस्थेबाबत डॉक्टरांना कळले. हा विषय विस्मरणात गेला असतानाच बडनेरातील एका दोन महिन्याच्या मुलासोबतही असाच  प्रकार घडला. सध्या हा बाळ जिवंत आहे. दरम्यान, मेडिकलच्या डॉक्टरांना हा प्रकार तेथून नातेवाईकांनी कळवताच येथील अधिकाऱ्यांचे धाबे दणाणले. या घटनेमुळे येथील डॉक्टरांना पुन्हा पंधरा वर्षांपूर्वीच्या घटनेची आठवण झाली. या विषयावर आता बालरोग विभागाकडून विशेष अभ्यास केला जाणार आहे. याबाबत मेडिकलच्या बालरोग विभागातील अधिकाऱ्यांकडून दुजोरा देण्यात आला.