राजेश्वर ठाकरे

अडीच हजार टन संत्री रेल्वेने दुसऱ्या शहरांत, पतंजलीला दिलेल्या कोटय़वधींच्या जागेचा उपयोग काय?

स्थानिक संत्री उत्पादकांना बाजारपेठ उपलब्ध व्हावी म्हणून नागपुरातील मिहानमध्ये  रामदेबाबा यांच्या ‘पंतजली फूड व हर्बल पार्क’ला कोटय़वधींचा भूखंड कमी किमतीत देण्यात आला. परंतु या प्रकल्पाचे काम वर्षभरापासून ठप्पच असल्याने सुमारे अडीच हजार टन संत्री रेल्वेने दिल्ली व कोलकाताच्या बाजारात पाठवण्यात आली आहे. येथील संत्री बाहेरच पाठवायची असेल तर पंतजलीच्या फू ड पार्कचा उपयोग काय, असा प्रश्न येथील संत्री उत्पादक उपस्थित करीत आहेत.

नागपूरच्या मिहानमध्ये रामदेबाबा यांच्या ‘पंतजली फूड व हर्बल पार्क’ला स्वस्त दरात २३० एकर जमीन  देण्यात आली. सप्टेंबर २०१६ ला धडाक्यात भूमिपूजन झाले. गोदाम उभारण्यात सुरुवात  झाली. काही यंत्रसामग्रीसुद्धा आली. मात्र, नंतर आर्थिक अडचणीत सापडलेल्या पतंजलीने वर्षभरापासून काम बंद केले आहे. आता येथे सुरक्षा रक्षकाशिवाय कुणीही नाही.

दरम्यान, यंदा किसान रेल्वेने विदर्भ आणि मध्यप्रदेशातील सीमाभागातील संत्री दिल्ली आणि  कोलकाताकडे रवाना केली.  चालू हंगामात आजवर दहा किसान रेल्वे सोडण्यात आल्या. यामध्ये  २ हजार १५० टन  आणि दक्षिण-पूर्व-मध्य रेल्वेने एका किसान रेल्वेने १५५ टन संत्री पाठवली आहेत. यातून मध्य रेल्वेला ६४ लाख ७६ हजार रुपयांचे मालभाडे मिळाले. मध्य रेल्वे आठवडय़ात दर बुधवारी दिल्लीला आणि आठवडय़ातून दोनदा कोलकाता येथे संत्री पाठवत आहे, असे मध्य रेल्वेचे सहायक वाणिज्य व्यवस्थापक एस.जी. राव यांनी सांगितले. विदर्भातील संत्रा उत्पादकांना चांगला भाव मिळावा आणि स्थानिक १० हजार युवकांना थेट रोजगार मिळावा, म्हणून मिहानध्ये ‘पंतजली फूड व हर्बल पार्क’ उभारण्याची योजना होती. त्यासाठी तत्कालीन राज्य सरकारने रामदेवबाबा यांच्या पंतजली समूहाला विशेष आर्थिक क्षेत्राबाहेर  २५ लाख रुपये प्रतिएकर या दराने जमीन दिली. त्यावेळी या भागातील इतर उद्योजकांना मात्र ६० लाख ते १ कोटी रुपये दर आकारले जात होते. मात्र, चार वर्षांनंतरही  काम पूर्ण झाले नाही. यासंदर्भात महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनीने (एमएडीसी) पतंजलीच्या हरिद्वार येथील मुख्यालयाकडे पाठपुरावा सुरू केला आहे. परंतु त्याला पतंजलीकडून प्रतिसाद मिळत नाही. पतंजलीने या कारखान्यासाठी ५०० ते ६०० कोटी रुपयांची गुंतवणूक केली आहे. पण, अजून १२०० कोटींची आवश्यकता आहे, असे एमएडीसीचे अधिकारी सांगतात. यासंदर्भात एमएडीसीचे तांत्रिक सल्लागार म्हणाले, कारखान्याचे सुमारे ८० टक्के बांधकाम झाले आहे. पतंजलीला आर्थिक अडचण आहे. त्यामुळे मिहानमधील कारखान्याचे काम बंद आहे.

फूड पार्कचे औचित्य काय? – राऊत

किसान रेल्वेच्या माध्यमातून विदर्भातील संत्री विक्रीसाठी देशभर नेण्यात येत आहे. शेतकऱ्यांना बाजारपेठ मिळत आहे. अशा स्थितीत मिहानध्ये स्वस्त दरात २३० एकर जमीन देण्याचे आणि पतंजलीच्या बंद पडलेल्या संत्री प्रक्रिया उद्योगाचे औचित्य काय, असा सवाल ऊर्जा व नागपूर जिल्ह्य़ाचे पालकमंत्री डॉ. नितीन राऊत यांनी केला.