प्राणघातक हल्ल्याचा गुन्हा दाखल

नागपूर : तहसीलदाराला जवळपास १५ किमी फरफटत नेणाऱ्या दोन वाळू तस्करांना उमरेड पोलिसांनी अटक केली आहे. तहसीलदाराच्या तक्रारीनंतर पोलिसांनी प्राणघातक हल्ल्याचा गुन्हा दाखल केला आहे. शाहरुख शेख हारुन शेख  (२४) रा. बहादुरा व अविनाश ऊर्फ अश्विन प्रल्हाद ढोणे (२५) रा. पाचगाव अशी आरोपींची नावे आहेत.

तहसीलदार प्रमोद कदम व नायब तहसीलदार योगेश शिंदे असे या घटनेतून बचावलेल्यांची नावे आहेत. अवैध वाळू उत्खनन, ओव्हरलोड आणि विना रॉयल्टी वाळू वाहतुकीचे प्रमाण उमरेड भागात गेल्या काही दिवसांपासून वाढले आहे. त्याला आळा घालण्यासाठी उमरेडचे तहसीलदार प्रमोद कदम, नायब तहसीलदार योगेश शिंदे व त्यांच्या सहकाऱ्यांनी मंगळवारी सकाळच्या सुमारास उमरेड-भिवापूर मार्गावरील रेल्वे क्रॉसिंगजवळ वाळूच्या वाहनांची तपासणी करायला सुरुवात केली. त्यांनी एका टिप्परला थांबवण्यासाठी हात दाखवला. मात्र, चालकाने नायब तहसीलदार योगेश शिंदे यांच्या अंगावर टिप्पर नेण्याचा प्रयत्न केला. शिंदे यांनी लगेच बाजूला उडी मारत स्वत:चा बचाव केला.

टिप्परचा वेग मंदावल्याने तहसीलदार कदम हे टिप्परच्या पायदानावर पाय ठेवून वर लटकले. त्यातच चालकाने वेग वाढवला. त्यामुळे त्यांना उतरणे किंवा उडी घेणे शक्य नव्हते. त्यांनी टिप्परला लटकून १५ कि.मी. प्रवास केला आणि उटी (ता. भिवापूर) शिवारात टिप्परचा वेग कमी होताच खाली उडी मारली. सुदैवाने त्यांना दुखापत झाली नाही. त्यानंतर तहसीलदारांनी कामबंद आंदोलन करीत जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले. तहसीलदारांच्या तक्रारीवरून उमरेड पोलिसांनी प्राणघातक हल्ल्याचा गुन्हा दाखल केला व दोघांना अटक केली. तहसीलदार बरमुडा घालून असल्याने त्यांना ओळखले नाही, असे आरोपींनी सांगितल्याचे समजते.