उच्च न्यायालयात एसआयटीचे प्रतिज्ञापत्र

 नागपूर : अमरावती जिल्ह्य़ातील रायगड नदी सिंचन प्रकल्प आणि वाघाडी सिंचन प्रकल्पाचे कंत्राट मिळवण्यासाठी बनावट दस्तावेज सादर केल्याप्रकरणी अमरावती येथील विशेष तपास पथकाने बाजोरिया कन्स्ट्रक्शनविरुद्ध चांदूर रेल्वे पोलीस ठाणे आणि दर्यापूर पोलीस ठाण्यात दोन गुन्हे दाखल केले आहेत, ही माहिती एसआयटीचे पोलीस निरीक्षक उदेसिंग साळुंके यांनी उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात प्रतिज्ञापत्र दाखल करून दिली.

विविध सिंचन प्रकल्पातील गैरव्यवहारासंदर्भात यवतमाळ येथील सामाजिक कार्यकर्ते अतुल आनंदराव जगताप यांनी याचिका दाखल केल्या आहेत. त्या याचिकेनुसार, या दोन्ही प्रकल्पांचे काम मिळण्यासाठी बाजोरिया कन्स्ट्रक्शन कंपनीने अर्ज केला होता, परंतु या कंपन्यांकडे मूलभूत कागदपत्रे नव्हती. कंपनीचे संचालक संदीप बाजोरिया यांचे तत्कालीन उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याशी सलोख्याचे संबंध होते. त्यामुळे त्यांनी कंत्राट मिळवून घेतले. चांदूर रेल्वे येथील प्रकल्पाचे काम २०१० मध्ये, तर वाघाडीचे काम २०१२ पर्यंत पूर्ण होणे अपेक्षित होते. मात्र, अद्याप दोन्ही प्रकल्पांचे ५० टक्केही काम पूर्ण झालेले नाही. त्याउलट कंत्राटदार कंपनीला विदर्भ सिंचन विकास महामंडळाने (व्हीआयडीसी) आगाऊ पैसे दिले. या प्रकल्पांची माहिती माहितीच्या अधिकारात मिळवली असता हा सर्व प्रकार उघडकीस आला, असा दावा याचिकाकर्त्यांने केला. त्यामुळे कंत्राट प्रक्रियेची उच्चस्तरीय चौकशी करून संबंधितांविरुद्ध फौजदारी कारवाई करण्यात यावी, कंत्राट रद्द करून नवीन कंत्राट प्रक्रिया राबवण्यात यावी, अशी विनंती याचिकाकर्त्यांनी केली.

त्यानंतर उच्च न्यायालयाने सिंचन घोटाळ्याच्या चौकशीवर नाराजी व्यक्त करून एसआयटी स्थापन करण्याचे आदेश दिले. मागील सुनावणीवेळी न्यायालयाने सिंचन घोटाळ्याच्या चौकशीवर नियंत्रण ठेवण्यासाठी दोन सेवानिवृत्त न्यायमूर्तीची समिती स्थापन करण्यास सांगितले व प्रतिवादींना सूचना मागवल्या.

यादरम्यान एसआयटीने प्रतिज्ञापत्र दाखल करून बाजोरिया कन्स्ट्रक्शनविरुद्ध दोन गुन्हे दाखल केल्याची माहिती दिली. यातील चांदूरबाजारचा गुन्हा ६ मार्च २०१८ ला दाखल करण्यात आला तर दर्यापूरचा गुन्हा १० जुलै २०१८ ला नोंदवण्यात आला आहे. यापूर्वी बुलढाणा शहर पोलीस ठाण्यात एक गुन्हा दाखल आहे. या प्रकरणावर उद्या, गुरुवारी न्या. भूषण धर्माधिकारी आणि न्या. झका हक यांच्यासमक्ष सुनावणी होईल.