नाना पटोले यांच्या नेतृत्वातील प्रदेश काँग्रेस देखील घराणेशाहीपासून मुक्त राहू शकलेली नाही. शेकडो सक्षम कार्यकर्ते पक्षासाठी झटायला तयार असताना पटोले यांच्या संघात एकाच कुटुंबातील दोघांना उपाध्यक्षपद बहाल करण्यात आल्याने कार्यकर्त्यांमध्ये नाराजी आहे. प्रदेश काँग्रेसच्या उपाध्यक्षपदी चारुलता टोकस यांची नियुक्ती झाली आहे. शिवाय यापूर्वीपासूनच रणजित कांबळे  उपाध्यक्ष आहेत.  हे  दोघेही  एकाच जिल्ह्य़ातील असून मावसभाऊ आहेत.

काँग्रेस पक्षश्रेष्ठींनी शुक्रवारी प्रदेश काँग्रेसचे अतिरिक्त उपाध्यक्ष आणि ससंदीय मंडळ सदस्यांच्या नावाला मंजुरी दिली. विदर्भात आणखी चार उपाध्यक्ष करण्यात आले. वर्धा जिल्ह्य़ातून चारुलता टोकस यांना उपाध्यक्षपद देण्यात आले आहे. आधी त्या महिला प्रदेश काँग्रेसच्या अध्यक्ष होत्या. त्यांच्याऐवजी यवतमाळ येथील संध्या सव्वालाखे यांना महिला काँग्रेस प्रदेशाध्यक्ष करण्यात आले होते. त्यामुळे त्या नाराज होत्या. आता त्यांचे पुनर्वसन करण्यात आले आहे. पण, हे करताना त्यांचे मावसभाऊ रणजित कांबळे यांना आधीच उपाध्यक्षपद दिल्याचा विसर प्रदेश काँग्रेसला पडला आहे.

टोकस यांची नियुक्ती करून काँग्रेसने वर्धा जिल्ह्य़ातील एकाच घरातील दोघांना उपाध्यक्ष केले आहे. टोकस यांना महिला प्रदेशाध्यक्षपद, त्यानंतर लोकसभेची उमेदवारी आणि आता प्रदेश उपाध्यक्षपद मिळाले आहे. त्या वर्धेत राहत नसल्याने त्यांचा संपर्क उरला नाही. केवळ निवडणूक लढण्यापुरत्या त्या मतदारसंघात आल्या होत्या. करोनाकाळात मतदारसंघातील लोकांच्या मदतीला त्या आल्याचे ऐकिवात नाही. त्यांच्या नियुक्तीने कार्यकर्ते नाराज झाले आहेत. एकाच घरात पदे वाटण्यापेक्षा पक्ष वाढीसाठी काम करणाऱ्या कार्यकर्त्यांना संधी देणे आवश्यक होते, अशी भावना स्थानिक कार्यकर्त्यांची आहे. अखिल भारतीय काँग्रेस सरचिटणीसांनी प्रसिद्ध केलेल्या यादीत  नाना गांवडे (नागपूर), सचिन नाईक (यवतमाळ), संजय राठोड (बुलढाणा), चारुलता टोकस (वर्धा) यांचा समावेश आहे. पहिल्या यादीत कार्याध्यक्ष म्हणून शिवाजी मोघे (यवतमाळ) आणि उपाध्यक्षपदी रणजित कांबळे (वर्धा) यांचा समावेश होता.

तेली समाजाच्या नेतृत्वाची उणीव

पटोले यांच्या नेतृत्वातील प्रदेश काँग्रेसच्या कार्यकारिणीत तेली समाजातील नेत्यांना संधी देण्यात आलेली नाही. मात्र, संध्या सव्वालाखे यांच्याकडे प्रदेश महिला काँग्रेस अध्यक्षपदाची धुरा देऊन समतोल साधण्याचा प्रयत्न झाला आहे.