विद्यापीठाने चार भजनातच औपचारिकता आटोपली; दीडशेव्या जयंतीनिमित्त एकही विशेष उपक्रम नाही

देशभरात राष्ट्रपिता महात्मा गांधींची १५० वी जयंती उत्साहात साजरी केली जात असताना राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाला गांधींची आठवण केवळ चार भजनांच्या औपचारिकतेपुरती झाली. वर्षभर विविध व्याख्यानमाला, चर्चासत्रे, परिसंवाद एवढेच नव्हे तर लोकांच्याही फारशा स्मरणात नसणाऱ्या कवी, साहित्यिकांवर दोन-दोन दिवसांचे कार्यक्रम आयोजित करणाऱ्या विद्यापीठाला गांधींची मात्र विशेष दखल घ्यावीशी वाटली नाही, याबाबत आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

२ ऑक्टोबर रोजी नागपूरमध्ये अनेक कार्यक्रम झाले. केवळ नागपूर, महाराष्ट्रातच नव्हे तर देशभरात राजकीय, सामाजिक संस्थांनी पदयात्रा काढल्या, चिंतन शिबिरे घेऊन गांधींचे महत्त्व समाजाला नव्याने पटवून सांगितले. सेवाग्राम येथील गांधीजींच्या आश्रमात गांधीवाद्यांची भाषणे झाली. केंद्र आणि राज्य सरकारनेही भव्य कार्यक्रमांचे आयोजन करून गांधींना श्रद्धांजली अर्पण केली. मात्र, विद्यापीठाला यातले काहीही सुचले नाही. दोन ऑक्टोबर रोजी विभागातील गांधी पुतळ्याला पुष्पहार अर्पण, कुलगुरूंचे भाषण आणि भजन असा दोन तासांचा कार्यक्रम पार पडला. तर याच विद्यापीठाने कर्नल प्रबीर सेनगुप्ता, माजी राजदूत डॉ. दीपक वोरा, राज्य निवडणूक आयुक्त जे.एस. सहारिया यांचे भाषण आयोजित करण्यासाठी मात्र विशेष तत्परता दाखवली होती.

कुलगुरूंना लवकरच प्रस्ताव देऊ

गांधी जयंतीदिनी आम्ही कुलगुरू, प्र-कुलगुरू, विद्यार्थी, प्राध्यापकांना आमंत्रित केले होते. कुलगुरूंचे भाषण आणि भजनांचाही कार्यक्रम झाला. १५०व्या जयंतीनिमित्त वर्षभर कार्यक्रम साजरे करण्यात येणार आहेत. अद्याप तसा प्रस्ताव कुलगुरूंना दिलेले नाही. पण लवकरच देऊ.

– प्रमोद वाटकर, प्रभारी विभाग प्रमुख, गांधी विचारधारा

दरवर्षीप्रमाणे गांधी भवनात जयंतीचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. गांधींच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करुन भजनांचा कार्यक्रम पार पडला. १५०वी जयंती असल्याने वर्षभर कार्यक्रम करण्यास वाव आहे, परंतु सध्यातरी कार्यक्रमांच्या आखणीसंदर्भात विभागाने असे कोणतेही पत्र दिलेले नाही.

– डॉ. सिद्धार्थ काणे,  कुलगुरू, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ