पूर्व विदर्भात अतिसारचे रुग्ण दुपटीने वाढले

नागपूर : सार्वजनिक आरोग्य विभागाकडून पूर्व विदर्भात सर्वच आजार नियंत्रणात असल्याचा दावा केला जातो. परंतु गेल्या तीन वर्षांत प्रथमच यंदा नागपूर जिल्ह्य़ात कावीळने (व्हायरल हिपेटायटीस) दोन बळी

घेतल्याचे पुढे आले आहे. पूर्व विदर्भात गेल्यावर्षीच्या तुलनेत अतिसाराचेही (गॅस्ट्रो) रुग्ण दुपटीने वाढले आहेत. माहितीच्या अधिकारातून ही बाब समोर आली आहे.

दूषित पाणी प्राषण केल्यामुळे कावीळ, अतिसार, टायफाईड, हगवण (डायरिया) सह इतरही जलजन्य आजार होतात. हे आजार पावसाळा आणि उन्हाळ्यामध्ये जास्त होतात. नागपूरच्या आरोग्य उपसंचालक कार्यालयातील नोंदीनुसार, १ जानेवारी ते ३१ डिसेंबर २०१८ मध्ये नागपूर विभागातील सहा जिल्ह्य़ांमध्ये अतिसाराचे तब्बल ४ हजार ७२२ रुग्ण आढळले होते.

आरोग्य विभागाकडून योग्य उपाय करून दुसऱ्या वर्षी हे आजार कमी करण्याचे प्रयत्न झाले.  परंतु १ जानेवारी ते ऑक्टोबर- २०१९ या कालावधीत हे रुग्ण उलट दुपटीहून वाढून तब्बल १० हजार ८१० इतके झाले.

नागपूर महापालिकेच्या अखत्यारित असलेल्या खासगी व शासकीय रुग्णालयांतही या आजाराच्या रुग्णांची संख्या खूप असल्याचे खुद्द डॉक्टरच नाव न टाकण्याच्या अटीवर सांगतात. परंतु आरोग्य विभागाच्या नोंदीत या भागात २०१८ या वर्षांत केवळ १८१ आणि २०१९ या वर्षांच्या दहा महिन्यांत केवळ १५ रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. त्यामुळे आरोग्य विभागाकडूना रुग्णांची लपवा-छपवी केली जाते काय, हा प्रश्न उपस्थित झाला आहे. पूर्व विदर्भातील सहा जिल्ह्य़ात २०१८ मध्ये कावीळचे ४५ रुग्ण आढळले असले तरी एकही मृत्यू नोंदवण्यात आला नाही, तर २०१९ च्या दहा महिन्यांत येथे २८ रुग्ण नोंदवण्यात आले.

पैकी उपचारादरम्यान दोघांच्या मृत्यूची नोंद आहे. त्यापूर्वी २०१७ आणि २०१८ या दोन वर्षांत येथे एकाही मृत्यूची नोंद नसल्याचे माहितीच्या अधिकारातून सामाजिक कार्यकर्ते अभय कोलारकर यांनी पुढे आणले आहे.

नागपुरात डायरिया, टायफाईडचे रुग्णच नाही

आरोग्य विभागाच्या नोंदीत १ जानेवारी ते ऑक्टोबर २०१९ या दहा महिन्यांच्या कालावधीत नागपूर जिल्ह्य़ात डायरिया (हगवण) आणि टायफाईड या आजाराचा एकही रुग्ण नोंदवण्यात आला नाही. नागपूर महापालिकेच्या अखत्यारित असलेल्या आयसोलेशन या एकाच रुग्णालयांत वर्षांला मोठय़ा संख्येने या आजाराच्या रुग्णांची नोंद होते. परंतु ती आरोग्य विभागाला कळवली जात नाही काय, असा प्रश्न यातून उपस्थित झाला आहे.