शहर आणि ग्रामीणचा प्रत्येकी एक रुग्ण

नागपूर : शहरासह पूर्व विदर्भात करोनानंतर आता  डेंग्यूही पाय पसरताना दिसत आहे. आरोग्य विभागाच्या पुणे कार्यालयाच्या नोंदीनुसार, नागपूरच्या शहर आणि ग्रामीण भागातील प्रत्येकी एक अशा दोघांचा डेंग्यूने मृत्यू झाला आहे. १ जानेवारी २०२० पासून आजपर्यंत आढळलेल्या एकूण डेंग्यूग्रस्तांची संख्याही आता  ९१ वर पोहोचली आहे.

नागपूर विभागातील सहा जिल्ह्य़ांमध्ये  २०१९ मध्ये डेंग्यूच्या १,३१६ रुग्णांची नोंद झाली होती. यापैकी ११ जणांचा मृत्यू झाला होता. एकूण रुग्णांमध्ये उपराजधानीतील साडेसहाशेच्या जवळपास रुग्णांचा समावेश

होता. यंदा करोनावर नियंत्रणासाठी आरोग्य विभागाकडून विविध उपाय सुरू असताना डेंग्यूवर नियंत्रणासाठीही कीटकनाशक फवारणी व  इतर उपाय सुरू असल्याचे आरोग्य खात्याचे म्हणणे आहे. परंतु आता हळूहळू डेंग्यूचेही रुग्ण विभागात वाढत आहेत. नागपूर विभागात सहा महिन्यात ९१ डेंग्यूचे रुग्ण आढळले.

त्यात नागपूर जिल्ह्य़ातील २९ जणांचा समावेश होता. यापैकी नागपूर शहरातील एक आणि ग्रामीणच्या एकाचा मृत्यू झाला. विभागातील एकूण ९१ डेंग्यूग्रस्तांमध्ये १३  नागपूर ग्रामीण, १६  नागपूर शहर, चंद्रपूर ग्रामीण ४०, चंद्रपूर शहर ६, गडचिरोली १, गोंदिया ४, भंडारा ४, वर्धेतील ७ रुग्णांचा समावेश आहे. डेंग्यूचे एवढे रुग्ण आढळल्याच्या वृत्ताला नागपूरच्या आरोग्य उपसंचालक कार्यालयाने दुजोरा दिला आहे.

डेंग्यूवर नियंत्रण मिळवणे शक्य आहे. परंतु प्रत्येकाने  स्वच्छता राखणे आवश्यक आहे. ग्रामीण भागात ग्रामपंचायत सर्वोच्च संस्था आहे. त्यांनी पुढाकार घेऊन  स्वच्छतेबाबत जनजागृती करायला हवी. सोबत आठवडय़ातील एक दिवस कोरडा दिवस पाळायला हवा. आरोग्य विभागाकडून कीटकनाशक फवारणीसह इतरही उपक्रम सुरू आहेत.

– डॉ. श्रीराम गोगुलवार,सहायक संचालक, आरोग्य विभाग (हिवताप).