मंगेश राऊत

काही दिवसांपासून शहर पोलीस विभाग कर्मचाऱ्यांच्या गैरकृत्यांमुळे अतिशय चर्चेत आला आहे. पोलीस उपनिरीक्षकाने एका तरुणीचा विनयभंग केला तर दुसऱ्या एका घटनेत दारू तस्करीमध्ये वाहतूक पोलीस शिपाई सापडला. या घटनांमुळे पोलिसांची प्रतिमा दिवसेंदिवस खालावत चालली आहे. आता दोन शिपायांमुळे गुन्हे शाखेचे युनिट-५ पुरते त्रस्त झाले असून हे कर्मचारी आता डोईजड झाल्याची भावना सहकारी कर्मचाऱ्यांकडून व्यक्त होऊ लागली आहे.

गुन्हे शाखेच्या युनिट-५ मध्ये कार्यरत असलेले कल्लू व मंगेश या शिपायांच्या जोडगोळीने सर्व युनिट त्रस्त आहे. या दोन शिपायांचे परिमंडळ-५ मध्ये येणाऱ्या पोलीस ठाण्यातील अनेक अवैध धंदेवाल्यांशी संगनमत असल्याने कुणी कारवाईसाठी जात असताना विभागाची माहिती पूर्वीच गुन्हेगारांना देत असल्याची चर्चा विभागात आहे.

चौकशीसाठी येणाऱ्या प्रकरणांमध्ये स्वत:च ‘तोडी’  करून युनिटमधील अधिकाऱ्यांना कारवाई न करण्याचे आदेश ते देतात. त्यांनी न ऐकल्यास त्यांना सहकार्य करीत नाही. युनिटमध्ये कार्यरत असलेल्या अधिकाऱ्यांपासून ते इतर कर्मचाऱ्यांपर्यंत सर्वाच्या कामांत ते लुडबूड करीत असल्याची चर्चा आहे.

या दोघांच्या व्यवहारामुळे अधिकारी व कर्मचाऱ्यांना प्रचंड मन:स्ताप सहन करावा लागत असून ते आपल्या युनिट अंतर्गत असणाऱ्या गुन्हेगारांवर कारवाई करू देत नसल्याची माहिती समोर येत आहे.

त्यांच्या व्यवहारामुळे अनेक अधिकारी युनिट-५ मध्ये काम करण्यास नकार देत असून अतिरिक्त पोलीस आयुक्त नीलेश भरणे यांच्यासमोर युनिटमधून काम करवून घेण्याचे मोठे आव्हान आहे. या कर्मचाऱ्यांवर कोणती कारवाई होते, हे बघण्यासारखे आहे.

चौकशी करून कारवाई करू

पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांनी कायद्याच्या चौकटीत राहूनच काम केले पाहिजे. कोणताही कर्मचारी यंत्रणेपेक्षा मोठा नसून अशी तक्रार असल्यास गुन्हे शाखेच्या अतिरिक्त पोलीस आयुक्तांना त्यासंदर्भात अहवाल मागवून योग्य ती कारवाई करण्यात येईल. त्यात ते दोषी आढळल्यानंतर त्यांना सेवेतूनही कमी केले जाऊ शकते.

– रवींद्र कदम, सहपोलीस आयुक्त.