विरोधी पक्षातील नेत्यांच्या प्रश्नांना सडेतोड उत्तरे देणारे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी मात्र दोन चिमुरडय़ांनी विचारलेल्या प्रश्नांना अतिशय समर्पक उत्तरे दिली. निमित्त होते नागपुरात आयोजित करण्यात आलेल्या बाल साहित्य संमेलनाचे. दिवसभराच्या व्यस्त कार्यक्रमात काही क्षण दोन्ही प्रमुख नेते लहान मुलांमध्ये रमले.

उपराजधानीतील राजाराम सीताराम दीक्षित वाचनालय आणि महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृ ती मंडळाच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या बाल साहित्य संमेलनाचे उद्घाटन साहित्यिक गोविंद गोडबोले यांच्या हस्ते करण्यात आले. खामला परिसरातील सांस्कृतिक सभागृहात या संमेलनाचे आयोजन करण्यात आले. पहिल्या दिवशीच संमेलनात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय नितीन गडकरी यांची इशिका लिमये आणि आचल डवले या बाल साहित्यिकांनी मुलाखत घेतली. मुलाखत घेताना या दोन छोटय़ा मुलींनी दोन्ही नेत्यांवर प्रश्नांचा भडीमार केला आणि एरवी राजकारणाशी संबंधित प्रश्न न विचारल्यामुळे गप्पाच्या ओघात त्यांना उत्तर देणे कठीण झाले. इशिका लिमये हिने मुख्यमंत्र्यांची मुलाखत घेताना काका तुम्हाला लहानपण़ापासून काय बनायची इच्छा होती, असे विचारले असताना मला मोठ्ठे व्हायचे होते असे उत्तर दिल्याने बच्चे कंपनीने टाळ्याचा कडकडाट केला. मुलगी दिविजाला तुम्ही कसे वेळ देता, असे विचारले असता मुख्यमंत्री म्हणाले, कामाची व्यस्तता आणि वेळेचे व्यवस्थापन करून तिला वेळ देत असतो. मला खूप काम असेल तर तीच मला काम करा असे सांगत असते. मला लहानपणी चांदोबा, लोटपोट यासारखी पुस्तके वाटायला आवडत होती. आता वेगवेगळ्या थोरपुरुषांची आत्मचरित्रे वाचतो. नुकतेच एल अ‍ॅण्ड टी कंपनीच्या अध्यक्षांचे चरित्र वाचल्याचे त्यांनी आवर्जुन सांगितले.

नितीन गडकरी यांना शालेय जीवनातील आठवणी विचारताच मी खोडकर विद्यार्थी होतो, असे सांगितल्यावर मुलांनी टाळ्या वाजविल्या. मंत्री झाल्यावर भावना व्यक्त करताना गडकरी म्हणाले. लोकांना जास्त आनंद झाला. मोटारी विकत घेण्यापेक्षा लोकांनी सार्वजनिक वाहतूक यंत्रणेचा वापर करावा असा संदेश गडकरी यांनी दिला. तुम्हाला खवय्ये म्हटले जाते असे विचारले असता  आता खाणे नियंत्रित असल्याचे त्यांनी सांगितले.