घुबडी गावातील घटना 

नागपूर : आजोबाच्या शेततळयात पोहायला उतरलेल्या दोन मुलींचा बुडून मृत्यू झाला. ही हृदयद्रावक घटना गुरुवारी दुपारी १२ वाजताच्या सुमारास कोंढाळी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील घुबडी गावात घडली.

भाग्यश्री  विजय  येडमे (१२) आणि अर्चिता  गोमेश्वर  मंगाम (११ ) रा. घुबडी अशी मृत मुलींची नावे आहेत. दोघीही सातव्या वर्गात शिकत होत्या. घुबडी हे गाव वर्धा जिल्ह्य़ाच्या सीमेवर असून भाग्यश्रीचे आजोबा सेवकराम परतेती हे त्या गावात राहतात. करोनामुळे शाळेला सुटी असल्याने ती आजोबाकडे राहायला आली होती. आजोबाच्या शेतावर विहीर आहे. गुरुवारी भाग्यश्री हिने मैत्रीण अर्चिता व इतर दोन मुलींसह शेततळयात पोहोण्याचा बेत आखला. दुपारी १२ वाजता त्या शेतात गेल्या. भाग्यश्री व अर्चिता या दोघी तळ्यात उतरल्या व दोघी पारावर बसून होत्या. तळ्यातील पाण्याचा त्यांना अंदाज नव्हता. खोल पाण्यात गेल्यानंतर तळ्याच्या गाळामध्ये त्या फसल्या व वाचवा वाचवा अशा ओरडू लागल्या. पारावर बसलेल्या दोन्ही मुलींनी मदतीसाठी भाग्यश्रीचे आजोबा सेवकराम यांच्याकडे धाव घेतली. सेवकराम व गावकऱ्यांनी तळ्याच्या दिशेने गेले पण तोपर्यंत मुलींचा मृत्यू झाला होता. या घटनेची माहिती कोंढाळीचे ठाणेदार श्याम गव्हाणे यांना देण्यात आली. ते सहाय्यक फौजदार सुनील बन्सोड, शिपाई पन्नालाल  बटाऊवाले, अस्मिता गायकवाड, जया  नेहारे  व इतर घटनास्थळी पोहोचले.   पोलीस पोहोचेपर्यंत गावकऱ्यांनी दोन्ही मुलींना तळ्याबाहेर काढले  होते. त्यांना कोंढाळी प्राथमिक आरोग्य केंद्रात नेण्यात आले. वैद्यकीय अधिकारी डॉ. बिलाल पठाण यांनी त्यांना मृत घोषित केले. भाग्यश्रीचा बुधवारी वाढदिवस होता व याच मैत्रिणीसोबत तो साजरा केला होता. दोन मुलींच्या मृत्यूने घुबडी गावावर शोककळा पसरली आहे.