आंतरराष्ट्रीय व्याघ्र संवर्धन परिषदेच्या पाश्र्वभूमीवर वन्यजीव संवर्धन क्षेत्रातील एका गटाने जगात वाघांची संख्या वाढल्याचे जाहीर केले. त्यानंतर अवघ्या काही दिवसातच या गटाचा दावा खोटा असून दहा वर्षांत वाघ दुप्पट कसे होऊ शकतात, असा प्रश्न याच क्षेत्रातील दुसऱ्या गटाने उभा केला आहे. मुळातच वाघांच्या संख्यावाढीवरून वन्यजीव संवर्धन क्षेत्रातील दोन गटातील हे राजकारण व्याघ्र संवर्धनाचे भवितव्य तर खराब करणार नाही ना, अशी भीती आता व्यक्त केली जात आहे.

वन्यजीवांसाठी काम करणाऱ्या स्वयंसेवी संस्थांची यादी गेल्या काही वर्षांत प्रचंड वाढली आहे. यातील किती संस्था प्रत्यक्षात काम करतात आणि किती आंतरराष्ट्रीय निधीसाठी काम करतात, तर किती संस्था निधी मिळाल्यावर काम करतात किंवा नाही, हा गेल्या काही वर्षांत वादाचा मुद्दा ठरला आहे. व्याघ्र संवर्धन परिषद भारतात होणार, हे जाहीर झाल्यानंतरच या क्षेत्रातील अनेक काम करणाऱ्या व न करणाऱ्या संस्थांची पत्रके प्रसिद्धीस येऊ लागली होती. त्याच पाश्र्वभूमीवर डब्ल्यूडब्ल्यूएफ (वर्ल्ड वाईल्डलाईफ फोरम) व ग्लोबल टायगर फोरमने जगात वाघांची संख्या प्रथमच वाढली असून त्यातील निम्मे वाघ भारतात आहेत आणि भारतात गेली काही वष्रे वाघांच्या कमी होत चाललेल्या संख्येत सुधारणा होत असल्याचे जाहीर केले. मात्र, असे सांगताना देशातील प्रत्येक व्याघ्र प्रकल्पात किती वाघ आहेत, याविषयी त्यांनी काहीच स्पष्ट केले नाही. वाघांची संख्या वाढल्याच्या आनंदात या स्पष्टीकरणाची गरजही कोणाला भासली नाही आणि आनंद मात्र साजरा करण्यात आला.

दुसरीकडे, जगात वाघांची संख्या वाढल्याचा दावा अमेरिका, भारत, ब्रिटन आणि रशिया या देशातील व्याघ्रजीवशास्त्रज्ञांचा गटाने फेटाळला. दहा वर्षांत संख्या दुप्पट कशी होऊ शकते, असा प्रश्न त्यांनी उभा केला. यासाठी त्यांनी वाघांचे ४० टक्के अधिवास नष्ट झाल्याचे, शिकारीचे प्रमाण वाढल्याचे कारण दिले आहे. यात बऱ्याच अंशी सत्यही आहे. विकासात्मक प्रकल्पांमुळे वाघांच्या अधिवासांवर गदा आली आहे. पुनर्वसन केवळ दोनच राज्यात सुरू आहे आणि केवळ ५० टक्केच झाले आहे. दोन्ही राज्यात शिकाऱ्यांनी धुडगूस घातला आहे. या सर्व बाबी वाघांच्या संख्यावाढीवर प्रश्न निर्माण करणाऱ्या आहेत. यासंदर्भात डब्ल्यूडब्ल्यूएफ भारताचे मुख्य कार्यकारी अधिकारी रवी सिंग यांच्याशी संपर्क साधला असता तो होऊ शकला नाही.

हे कसे शक्य आहे -किशोर रिठे

वाघांची संख्या रात्रीतून वाढत नाही. प्रजनन वाढले आणि शिकार थांबली तर वाघांची संख्या वाढते. व्याघ्रक्षेत्रातील पुनर्वसन हेही वाघांच्या संख्यावाढीमागचे एक कारण आहे. भारतात दर चार वर्षांनी व्याघ्रगणना होते आणि नंतर त्याची आकडेवारी केंद्रातील वने व पर्यावरण खात्याकडून जाहीर केली जाते. अशावेळी खासगी संस्थेने परस्पर व्याघ्रसंख्यावाढ जाहीर करणे, हे न पटणारे आहे. भारतात महाराष्ट्र आणि मध्यप्रदेश या दोनच राज्यावर व्याघ्रसंख्येची मदार अवलंबून आहे. संपूर्ण देशात ५० व्याघ्रप्रकल्प असताना दोनच राज्यात पुनर्वसन प्रक्रिया सुरू आहे आणि ती कासवगतीने सुरू आहे. अशावेळी वाघांची संख्या वाढणे शक्य नाही, असे मत केंद्रीय वन्यजीव समितीचे माजी सदस्य किशोर रिठे यांनी व्यक्त केले.