प्रकल्प संचालक रवींद्र ठाकरे यांची माहिती

शासनाने विदर्भ आणि मराठवाडय़ातील शेतकऱ्यांच्या शेतीला जोडधंदा मिळावा म्हणून राष्ट्रीय दुग्धविकास मंडळ, आनंद यांच्या समवेत सामंजस्य करार केला आहे. त्यातून या भागातील ११ जिल्ह्य़ांत रोज सुमारे दोन लाख लिटर गाय- म्हशीचे दूध संकलित होत आहे. या उपक्रमाला आणखी वाढवण्यासाठी दूध उत्पादक शेतकऱ्यांची कंपनी तयार केली जाईल, असी माहिती विभागीय अतिरिक्त आयुक्त व दुग्ध विकास प्रकल्पाचे विभागीय संचालक रवींद्र ठाकरे यांनी सोमवारी माध्यम संवाद या उपक्रमाअंतर्गत दिली.

विदर्भ आणि मराठवाडय़ातील अनेक भागात दुग्ध व्यवसायाकडे कुणाचे लक्ष नव्हते. दुधाला दर मिळत नसण्यासह इतर कारणाने शेतकरी आपल्याकडील जनावरे विक्रीला काढत होते. हे चित्र बदलून शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवण्यासाठी राज्य शासनाने पुढाकार घेतला. त्याअंतर्गत नागपूरसह विदर्भ आणि मराठवाडय़ाच्या ११ जिल्ह्य़ांत पथदर्शी प्रयोग सुरू करण्यात आला. त्याअंतर्गत गेल्या वर्षभरात विदर्भ-मराठवाडय़ातील ७७७ संकलन केंद्रात १,१६४ गावातील २६ हजार ८११ शेतकरी दूध संकलित करतात. जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी  यात सहभागी होता व्हावे, या उद्देशाने विभागाने उत्पादकता वृद्धी कार्यक्रम हाती घेतला आहे.

त्याअंतर्गत शेतकऱ्यांना कृत्रिम रेतनाची सेवा दारापर्यंत पोहोचवणे, संतुलित पशुखाद्य व पूरक पशुखाद्य पुरवठा करणे, वैरण विकास कार्यक्रम, जनावरांमधील वंधत्व निवारण, दूध देण्याची क्षमतेवर उपचारासाठी गाव पातळीवर पशुवैद्यकीय सेवा पुरवणे आदी सुविधांचा समावेश आहे. विभागाद्वारे शेतकऱ्यांना मार्गदर्शन करून नव्या तंत्रज्ञानाद्वारे शेतकऱ्यांना दूध उत्पादन करण्याचा सल्ला दिला जातो.

तसेच शेतकऱ्यांना फॅटनुसार दुधाचे चांगले दर मिळत असल्याने शेतकऱ्यांचा कल वाढतो आहे. सध्या शेतकऱ्यांकडून म्हशीचे किमान ३४ व गाईचे दूध २४ रुपये प्रति लिटर या दरात खरेदी करीत असल्याचे त्यांनी सांगितले.

सध्या शहरात मदर डेअरीचे स्टॉल उभारण्यासाठी ७९ ठिकाण उपलब्ध करण्यात आले असून त्यातील ११ सुरू झाल्याची माहिती रवींद्र ठाकरे यांनी दिली.

शेतकऱ्यांना कृत्रिम रेतनाची सेवा दारापर्यंत पोहोचवणे, संतुलित पशुखाद्य व पूरक पशुखाद्य पुरवठा करणे, वैरण विकास कार्यक्रम, जनावरांमधील वंधत्व निवारण, दूध देण्याची क्षमतेवर उपचारासाठी गाव पातळीवर पशुवैद्यकीय सेवा पुरवणे आदी सुविधांचा समावेश आहे.