आईवडिलांनी कैद केले होते, पोलिसांच्या मदतीने सुटका
स्त्री-पुरुष यांनाच एकमेकांशी लग्न करण्याचा अधिकार आपल्या संस्कृतीत आहे. परंतु मागील काही काळापासून पुरुष-पुरुष (गे) आणि महिला-महिला (लेस्बियन) यांचेही एकमेकांशी संबंध असू शकतात आणि पाश्चिमात्य देशांप्रमाणे भारतातही अशा संबंधांना समाजमान्यता मिळावी, याचा लढा सुरू आहे. अद्यापही अशा संबंधांना कायदेशीर मान्यता मिळाली नसली, तरी उपराजधानीतील दोन मुलींनी समाजाचा विरोध झुगारून लग्न केले.
अंकिता आणि मधुरा (नाव बदललेले) अशी त्या दोन मुलींची नावे आहेत. अंकिता ही घरात पती, तर मधुरा ही पत्नीच्या भूमिकेत आहे. यासंदर्भात स्वत:ची ओळख जाहीर न करण्याच्या अटीवर अंकिताने निवडक प्रसारमाध्यमांना सांगितले की, दहाव्या वर्गात असताना वर्गातील मुली सुंदर मुलांविषयी चर्चा करीत होत्या. परंतु मुलांविषयी चर्चा करण्यात स्वारस्य नसायचे, तर वर्गातील इतर मुलींविषयीच आपल्याला नेहमी आकर्षण वाटत होते.
घरात आपल्यापेक्षा मोठा आणि लहान असलेले दोन्ही भावंडेच होते. त्यामुळे मनातली भावना मनातच राहिली. त्यामुळे शिक्षणावर लक्ष केंद्रित करण्याचा निर्णय घेतला. बारावीपर्यंतचे शिक्षण पूर्ण झाल्यानंतर एका शासकीय रुग्णालयात वॉर्ड मदतनीस म्हणून तात्पुरत्या स्वरूपातील काम मिळाले. त्या ठिकाणी मधुराशी परिचय झाला. कामाच्या ठिकाणी एकमेकींसोबत जेवण, चहा घेणे यातून मैत्री झाली. या मैत्रीतून एकमेकींच्या घरी ये-जा वाढली. यातून एकमेकांच्या आवडीनिवडी समजल्या असता मधुलाही आपण पसंत असल्याचे समजले. तेव्हापासून मैत्रीचे रूपांतर प्रेमात झाले, असे अंकिता म्हणाली.
आम्ही खूप जवळच्या मैत्रिणी असल्याने दोघांच्याही घरच्यांना आमच्यातील संबंधाचा संशय आला नाही. परंतु त्याच वर्षी मधुच्या आईवडिलांनी मधुराकरिता योग्य मुलाचे स्थळ शोधणे सुरू केले. याची माहिती त्यांनी मधुरालाही दिली. मधुरा ही कोणाशीच लग्न करण्यास तयार नव्हती. तिने तुझ्याशिवाय (अंकिता) जगू शकणार नाही, अशी भावना बोलून दाखवली. त्या दिवशी आम्ही एकमेकींशी लग्न करण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर त्या दोघीही घरातून पळून जबरपूरला निघून गेल्या. त्या ठिकाणी पैसे संपेपर्यंत त्या एक महिना राहिल्या. पैसे संपल्यानंतर त्या पुन्हा नागपुरात परतल्या. यावेळी त्यांच्या कुटुंबीयांना त्यांच्यावर संशय आला आणि त्यांच्या आईवडिलांनी त्यांना डांबून ठेवले.
मधुराचे आईवडील तिच्यावर मुलाशी लग्न करण्यासाठी दबाव टाकत होते. त्यावेळी त्यांनी भ्रमणध्वनीवरून एकमेकींशी संपर्क साधला आणि दोन आठवडय़ापूर्वी वाडी पोलीस ठाणे गाठून संरक्षणाची मागणी केली, अशी माहिती अंकिताने दिली.
मुलींनी असे पाऊल उचलल्याने त्यांच्या आईवडिलांनी त्यांना प्रचंड विरोध केला. परंतु हा विरोध झुगारून आणि वाडी पोलिसांच्या संरक्षणात डोंगरगड येथे त्या निघून गेल्या. त्या ठिकाणी त्यांनी एका पुजाऱ्याला हिंदू रितीरिवाजानुसार लग्न करायचे असल्याचे सांगितले. परंतु प्रथम मुलींचा विवाह कसा, असा प्रश्न पुजाऱ्याला पडला. समाजमान्यतेमुळे त्यानेही लग्न लावून देण्यास नकार दिला. परंतु अधिक विनंती केल्यावर पुजारी तयार झाला आणि एका मंदिरात आम्ही विवाह केला. आज स्वप्न साकार झाल्याचा अनुभव येत आहे, अशी प्रतिक्रिया अंकिताने व्यक्त केली. यासंदर्भात वाडी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक वांदिले यांच्याशी संपर्क केला असता वृत्ताला दुजोरा दिला.

कुटुंबप्रमुख अंकिता
घरात पतीची भूमिका अंकिता पार पाडत आहे. ती पूर्वी कॅटरिंग व्यवसायात काम करीत होती. आता तिने स्वत:च्या कामाविषयी माहिती देण्यास नकार दिला. परंतु पतीला पार पाडावयाच्या सर्व भूमिका अंकिताने स्वीकारल्या आहेत. ती कामावर जाते आणि मधुराचे भरणपोषण करते.