|| राजेश्वर ठाकरे

नागपूरमध्ये भाजपमधील गटबाजी उघड :- राज्यात मुख्यमंत्री पदासह सत्तापदांच्या समान वाटपाच्या मुद्दय़ावरून शिवसेना आणि भाजपने फारकत घेतली असताना नागपूरमध्ये भाजपला सत्तापदाच्या पेचास सामोरे जावे लागले. सव्वादोन वर्षांसाठी दोघांना महापौरपदाची संधी देण्याची वेळ भाजपवर आली असून, महापौर पदावरून पक्षातील गटबाजी उघड झाली आहे.

महापौर पदाच्या सव्वादोन वर्षांच्या कार्यकाळासाठी भाजपने संदीप जोशी आणि दयाशंकर तिवारी या पक्षाच्या दोन ज्येष्ठ नगरसेवकांची नावे निश्चित केली. १५१ सदस्यांच्या नागपूर महापालिकेत भाजपकडे १०८ नगरसेवक आहेत. महापालिकेचा कार्यकाळ फेब्रुवारी २०२२ पर्यंत आहे. पहिले अडीच वर्षांचे महापौर पद खुल्या प्रवर्गातील महिलेसाठी होते. त्या वेळी नंदा जिचकार यांची या पदावर वर्णी लागली होती. पक्षाचे ज्येष्ठ नेते व केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या गटाच्या मानल्या जाणाऱ्या जिचकार यांचा कार्यकाळ आता संपणार आहे. उर्वरित काळासाठी महापौर पद खुल्या प्रवर्गासाठी आहे. या पदासाठी गडकरींचे निकटवर्तीय मानले जाणारे ज्येष्ठ नगरसेवक दयाशंकर तिवारी, फडणवीस यांचे निकटवर्तीय मानले जाणारे संदीप जोशी हे दोन प्रमुख दावेदार होते. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, गडकरी यांनी तिवारी यांच्या नावाला मान्यता दिली होती. मात्र, पहिल्या अडीच वर्षांचे महापौर पदही गडकरींच्या निकटवर्तीयांना मिळाल्याने या वेळी फडणवीस गट महापौर पदावर ठाम राहिला. मात्र, नंतर मध्यममार्ग काढण्यात आला. संदीप जोशी

यांना दोन वेळा स्थायी समिती अध्यक्षपद, सभागृह नेतेपद आणि फडणवीस सरकारने महामंडळाचे अध्यक्षपद देऊन राज्यमंत्र्याचा दर्जा दिला होता. दयाशंकर तिवारी यांना आतापर्यंत केवळ सभागृह नेतेपद मिळाले आहे. महापालिकेत ते सर्वात ज्येष्ठ नगरसेवक आहेत. त्यामुळे हिंदी भाषक नगरसेवकांनी त्यांच्यासाठी समाजमाध्यमावर जोरदार मोहीम सुरू केली होती. विधानसभा निवडणुकीत पश्चिम नागपुरातून हिंदी भाषकाला उमेदवारी देण्यासाठी फलकबाजी करण्यात आली होती. हिंदी भाषक भाजपचा मतदार मानण्यात येत असला तरी गेल्या काही वर्षांपासून सत्तेत आपल्याला हवा तसा वाटा मिळत नसल्याची त्यांची भावना आहे. ही नाराजी पाहता या वेळी महापौर पदासाठी दयाशंकर तिवारी यांचे नाव समोर होते. मात्र, माजी मुख्यमंत्री फडणवीस यांनी त्यांचे निकटवर्तीय संदीप जोशी यांना महापौर करण्यासोबतच तिवारी यांनाही संधी मिळेल, असा मध्यममार्ग निवडला.

फडणवीस यांचा मध्यममार्ग

महापौर पदासाठी सोमवारी अर्ज करण्याचा शेवटचा दिवस होता. त्यासाठी शहरातील आमदारांची बैठक घेण्यात आली. ऐन वेळी माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महापौर पद तिवारी आणि जोशी यांच्यात वाटून घेण्याची सूचना केली. त्यानुसार संदीप जोशी आणि दयाशंकर तिवारी यांची नावे महापौर पदासाठी निश्चित करण्यात आली. आमदारांच्या बैठकीत तसा निर्णय घेण्यात आला. आधी संदीप जोशी आणि त्यानंतरच्या काळात दयाशंकर तिवारी महापौर होतील, असे भाजपचे शहराध्यक्ष प्रवीण दटके यांनी पत्रकार परिषदेत जाहीर केले.

पुण्यातही एक वर्षांसाठी महापौर, उपमहापौर पद

पुण्याच्या महापौर पदासाठी सत्ताधारी भाजपकडून स्थायी समितीचे माजी अध्यक्ष, नगरसेवक मुरलीधर मोहोळ यांचे नाव सोमवारी निश्चित करण्यात आले. उपमहापौर पदासाठी भाजपकडून सरस्वती शेंडगे यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली. महापौरपद खुल्या प्रवर्गासाठी आरक्षित झाल्यानंतर पक्षातील इच्छुकांची वाढलेली संख्या आणि अडीच वर्षांवर आलेली महापालिकेची निवडणूक लक्षात घेऊन नव्या महापौर आणि उपमहापौरांना प्रत्येकी एक वर्षांचा कालावधी दिला जाणार आहे. पक्षाच्या शहराध्यक्ष माधुरी मिसाळ यांनी त्याबाबतची माहिती दिली. म्हणजेच एका वर्षांनंतर नव्या चेहऱ्यांना संधी दिली जाणार आहे.