दहा दिवसांत सहा हत्या

नागपूर : गृहमंत्री अनिल देशमुख यांची वर्णी लागताच उपराजधानीसह जिल्ह्य़ात खुनाच्या घटना थांबण्याची चिन्हे दिसत नसून रविवारी नागपूर व सावनेर येथे दोन वेगवेगळ्या खुनाच्या घटना समोर आल्या. या घटनांनी शहर  व ग्रामीण हादरले असून  गेल्या दहा  दिवसांमध्ये खुनांच्या सहा  घटना घडल्या आहेत, हे विशेष.

ग्रामीणमधील सावनेर शहरातील नागदेव मंदिर चौकात रविवारी रात्री ८.३० वाजताच्या सुमारास खुनाची घटना घडली. अंगद सिंग असे मृताचे तर नरेंद्र सिंग असे आरोपीचे नाव आहे. अंगद व नरेंद्र हे दोघेही मंत्री सुनील केदार यांच्या जवळचे कार्यकर्ते होते. नरेंद्र सिंग याचे पूर्वीपासून शहरात  जिम असून त्या ठिकाणी अंगद हा प्रशिक्षक म्हणून काम करायचा. पण, काही दिवसांपूर्वी अंगदने नरेंद्रचे जिम सोडून स्वत:चे जीम सुरू केले. तेव्हापासून दोघांमध्ये व्यावसायिक स्पर्धा सुरू झाली. सप्टेंबर २०१९ मध्ये अंगदने सावनेरमध्ये आमदार शरीर सौष्ठव स्पर्धेचे आयोजन केले होते.

नरेंद्रने प्रशिक्षण दिलेल्या काही तरुणांनीसुद्धा या स्पर्धेत सहभाग घेतला होता. मात्र त्यापैकी कोणीही न जिंकल्याने नरेंद्रने या निकालावर आक्षेप घेतला होता. तेव्हापासून या दोघांच्या जिममध्ये वर्चस्वाची लढाई सुरू झाली होती. काही ना काही कारणांनी या दोघांमध्ये वाद सुरू होते. हे वाद मिटवण्यासाठी म्हणून नरेंद्रने अंगदला भेटायला बोलावले. मात्र नरेंद्रने सोबत सत्तूर आणले होते. दोघांमध्ये वाद सुरू झाला. नरेंद्रने त्याच्याकडील सत्तूर (शस्त्र) काढले आणि अंगदवर २० हून अधिक वार केले. यात अंगद गंभीर जखमी झाला. त्याला उपचारासाठी नागपुरात आणले असता डॉक्टरांनी त्याला तपासून मृत घोषित केले. हत्येनंतर नरेंद्र बाईकवर फरार झाला. रात्री उशिरा नरेंद्रने पोलीस ठाण्यात आत्मसमर्पण केले.

दुसरीकडे मानकापूर पोलीस ठाण्यांतर्गत रविवारी रात्री १० वाजता आनंद ललित खरे (४५) रा. झिंगाबाई टाकळी याचा खून झाला. याप्रकरणी शेरा ऊर्फ विक्की महतो (४६) याला अटक करण्यात आली. दोघेही नातेवाईक असून एकमेकांच्या शेजारी राहतात. दरम्यान, रात्रीच्या सुमारास आंनद हा शेराच्या घराबाहेर बसला होता. त्यावेळी शेराने त्याला घराबाहेर बसण्याचे कारण विचारले व दोघांमध्ये वाद झाला. या वादातून शेराने आनंदच्या पोटावर चाकूने वार करून त्याचा खून केला.

याप्रकरणी गुन्हा दाखल करून मानकापूर पोलिसांनी आरोपीला अटक केली. गेल्या ३ जानेवारीला अजनी, ७ जानेवारीला वाठोडा, यशोधरानगर आणि कन्हान येथे खुनाच्या घटना घडल्या, तर रविवारी या दोन खुनाच्या घटना घडल्या.