फेब्रुवारीपासून सुरुवात, केंद्रीय कृषीमंत्र्यांची माहिती
संत्रा उत्पादकांच्या उत्पन्नात वाढावे म्हणून संत्री निर्यात करण्यासाठी केंद्र सरकार विदर्भात नागपूर आणि अमरावती जिल्ह्य़ात प्रकल्प सुरू करणार असून त्याची सुरुवात येत्या फेब्रुवारीमध्ये होईल, असे केंद्रीय कृषी मंत्री राधामोहनसिंह यांनी येथे सांगितले. नागपुरात आयोजित एका कार्यक्रमात ते बोलत होते.
विदर्भातील संत्रा परदेशात गेल्यास त्याला भाव मिळेल आणि शेतकऱ्यांच्या उत्पान्नात वाढ होईल. या उद्देशाने कृषी व प्रक्रिया अन्न उत्पादन निर्यात विकास प्राधिकरण, केंद्रीय लिंबूवर्गीय फळ संशोधन संस्था, कृषी खाते यांच्या संयुक्त विद्यमाने हे प्रकल्प राबवण्यात येणार आहेत. या प्रकल्पाअंर्तगत नागपूर जिल्ह्य़ातील काटोल आणि अमरावती जिल्ह्य़ातील मोर्शी किंवा वरूड येथे संत्री उत्पादक शेतकऱ्यांचे गट तयार करण्यात येतील. यात १०० किंवा ४०० शेतकऱ्यांचा समावेश असेल. निर्यातक्षम संत्री लागवड तसेच पॅकेजिंग आणि निर्यातीसाठी आवश्यक बाबींचे प्रशिक्षण दिले जाणार आहे. यासाठी फेब्रुवारीपासून शेतकऱ्यांची नोंदणी सुरू करण्यात येत आहेत. अशा प्रकारचे गट द्राक्षे आणि डाळींब उत्पादक शेतकऱ्यांचे यापूर्वी तयार करण्यात आले आहे.
वाणिज्य मंत्रालयांर्तगत येणाऱ्या कृषी व प्रक्रिया अन्न उत्पादन निर्यात विकास प्राधिकरणाने यासाठी पुढाकार घेतला आहे. आता संत्रा उत्पादक शेतकऱ्यांचे अशाप्रकारचे गट तयार करण्यात येत आहेत, असे राधामोहन सिंह म्हणाले.
कृषी क्षेत्रात कधी नव्हे एवढी गुंतवणूक केली जात आहे. त्याचे परिणाम हळूहळू दिसायला लागले आहेत. २०२० पर्यंत ९९ प्रकल्प पूर्णत्वास येतील. माती परीक्षणासाठी १० हजार केंद्र सुरू करण्यात आले आहेत.
आतापर्यंत १० कोटी शेतकऱ्यांच्या शेतीच्या मातीचे हेल्थ कार्ड तयार करण्यात आले आहेत. शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढण्यासाठी पशूपालन, दूध उत्पादन आणि अन्न, फळांवर प्रक्रिया यावर देण्याशिवाय पर्याय नाही, असेही राधामोहनसिंह म्हणाले.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on December 18, 2017 1:02 am