31 May 2020

News Flash

दुचाकीच्या वेगाचे वेड जीवावर बेतले

धूम स्टाईल वेगाने दुचाकी चालवण्याचे वेड एका विद्यार्थ्यांच्या जीवावर बेतले.

 

अभियांत्रिकीचा विद्यार्थी ठार

धूम स्टाईल वेगाने दुचाकी चालवण्याचे वेड एका विद्यार्थ्यांच्या जीवावर बेतले. वळणावर दुचाकी अनियंत्रित होऊन झाडावर आदळली व यात विद्यार्थ्यांचा जागीच मृत्यू झाला. त्याच्या पाठीमागे बसलेले दोन विद्यार्थी गंभीर जखमी झाले. ही घटना आज मंगळवारी पहाटे ३ वाजताच्या सुमारास प्रतापनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील हिंगणा टी-पॉईंट परिसरात घडली.

अमन अशोक नवघरे (२०) रा. पोलीसनगर, हिंगणा मार्ग असे मृताचे नाव आहे. कीर्तीमान डी. रामरतना आणि इतर एकजण जखमी आहे. अमन हा मूळचा चंद्रपूर येथील असून त्याचे वडील अमरावती येथे नोकरी करतात. हिंगणा परिसरातील एका नामांकित अभियांत्रिकी महाविद्यालयामध्ये त्याने बी.ई. प्रथम वर्षांला नुकताच प्रवेश घेतला होता. महाविद्यालयात ये-जा करण्यासाठी त्याच्या वडिलांनी त्याला पल्सर-२०० ही दुचाकी घेऊन दिली. महाविद्यालय संपल्यानंतर तो दुचाकीने फिरायचा. सोमवारी रात्री तो आपल्या एमएच-२७, सीएम-५२३४ क्रमांकाच्या दुचाकीने मित्रांसह जेवणासाठी बाहेर पडला. एका दुचाकीवर तिघेजण ते प्रतापनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील आयटी पार्क परिसरात आले. या ठिकाणी त्यांनी रात्री उशिरापर्यंत पार्टी केली. त्यानंतर पहाटे ३ वाजताच्या सुमारास ते खोलीवर जाण्यासाठी निघाले. दुचाकी अमन चालवत होता. गाडी अतिशय वेगात होती. हिंगणा टी-पॉईंटच्या वळणावर त्याचे  नियंत्रण सुटले व दुचाकी रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या झाडाला धडकली. यात गाडी चक्काचूर होऊन अमनचा जागीच मृत्यू झाला. दुचाकीच्या गतिमीटरचा काटा १०५ वर लॉक  झाला होता. त्याशिवाय अमनच्या डोक्यात हेल्मेट नव्हते. जखमींना लता मंगेशकर रुग्णालयात दाखल करण्यात आले. अमनला मृत घोषित करून इतरांवर उपचार सुरू आहेत. त्यांचा मित्र ऋषभ चामाटे यांनी दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी गुन्हा दाखल केला.

वेगाची ‘फॅशन’ धोकादायक

बारावी उत्तीर्ण झाल्यानंतर अनेक पालक आपल्या मुलांना दुचाकी घेऊन देतात. शिक्षणासाठी घराबाहेर पडल्यानंतर मुले तुरुंगातून बाहेर पडल्याप्रमाणे हुंदळायला लागतात व दुचाकी अतिशय वेगाने व वेडीवाकडी चालवतात. यामुळे त्यांच्यासह रस्त्यांवरील इतर वाहनधारकांचीही सुरक्षा धोक्यात येत असते. महाविद्यालयीन तरुणामध्ये वेगाचे वेड असून अशाच एका प्रकरणात उच्च न्यायालयात दखल घेऊन जनहित याचिका दाखल करून घेतली आहे. या याचिकेवर न्यायालयाने आतापर्यंत अनेक आदेश दिले असताना अशा घटना वारंवार घडत आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 6, 2019 12:23 am

Web Title: two wheelers engineering student killed akp 94
Next Stories
1 काँग्रेस  कणखर विरोधी पक्षाची भूमिका बजावण्याच्या मानसिकतेत
2 कंत्राटी प्राध्यापक भरतीत मर्जीतील उमेदवारांना संधी
3 भूमिका न घेणे हा साहित्यिकांचा कचखाऊपणाच
Just Now!
X