News Flash

भूस्खलनामुळे विहिरीसोबत कुटुंबही जमिनीत दबले

सुधीर यादवराव चौधरी, यादवराव चौधरी, सुरेखा सुधीर चौधरी आणि मंदा महाजन हे अपघातातून बचावले.

विहीर जमिनीत धसल्यानंतर बचावकार्य करताना पोलीस व महापालिकेचे अधिकारी. (लोकसत्ता छायाचित्र)

दोन वर्षांच्या मुलाचा मृत्यू, चौघे बचावले

अचानक झालेल्या भूस्खलनामुळे घराच्या प्रवेशद्वारापुढील विहीर जमिनीत शिरल्याने परिसरात उभे असलेले अख्खे चौधरी कुटुंबच जमिनीखाली दबले गेले. या अपघातातून चार जण बचावले असून एका दोन वर्षांच्या चिमुकल्याचा दुर्दैवी अंत झाला. अंकुश सुधीर चौधरी रा. गायत्रीनगर, गोधनी रोड असे मृत मुलाचे नाव आहे.

सुधीर यादवराव चौधरी, यादवराव चौधरी, सुरेखा सुधीर चौधरी आणि मंदा महाजन हे अपघातातून बचावले. यादवराव हे सेवानिवृत्त आहेत. त्यांचे कुटुंब मूळचे चंद्रपूर येथील आहे. १९९४ मध्ये सुधीरचा विवाह नागपुरातील सुरेखा हिच्याशी झाला. त्यांना वेदांत (१०) आणि अंकुश ही दोन मुले आहेत. आठ वर्षांपासून सुधीर कुटुंबासह नागपुरातच वास्तव्यास आहे.

अडीच वर्षांपूर्वी तो मंगळवारी परिसरात भाडय़ाच्या घरात राहात होता. त्यानंतर त्याने महावितरणचे व्यवस्थापक राजेश शंकरराव कुंभारे रा. महाल यांचे गायत्रीनगरातील घर भाडय़ाने घेतले. सुधीर हा पूर्वी स्टार बसमध्ये पर्यवेक्षक म्हणून कामाला होता. सध्या तो रिलायन्स कंपनीत टॉवर लावण्याचे काम करतो.

बुधवारी महालक्ष्मीनिमित्त ते नातेवाईकाकडे जेवणासाठी गेले होते. तेथून रात्री उशिरा घरी परतले. त्यावेळी त्यांच्यासोबत सुरेखाची मावशी मंदा महाजन आल्या होत्या. गुरुवारी सुधीर घरी होता. मोठा मुलगा वेदांत शाळेत गेला होता. सकाळी ११ वाजताच्या सुमारास सुरेखा ही मुलगा अंकुशला कडेवर घेऊन मावशी मंदा यांच्यासोबत विहिरीच्या काठाजवळ गप्पा करीत उभी होती. त्यावेळी अचानक भूस्खलन झाले आणि संपूर्ण विहिरीसोबतच परिसरात उभे असलेलेही जमिनीत दबले गेले. काहीतरी पडण्याचा आवाज आल्यावर घरात बसलेले यादवराव आणि सुधीर बाहेर निघाले. सुधीरने पत्नी, मुलगा आणि मावशीला जमिनीतून खेचून बाहेर काढले. मात्र, सुरेखाच्या हातातून मुलगा सुटला. सुधीर व यादवराव यांनी विहिरीत उडी घेऊन सुधीरचा शोध घेतला पण तो सापडला नाही. दरम्यान, विहिरीतून बाहेर निघताना सुधीर व यादवराव यांच्यावरही माती पडली. त्यावेळी शेजारच्या लोकांनी दोरखंडाच्या सहाय्याने त्यांना ओढले. त्यानंतर पोलिसांना कळविण्यात आले. अग्निशमन पथकही दाखल झाले. त्यांनी जेसीबीने विहिरीतील माती काढली. दुपारी २ वाजता अंकुश सापडला. त्याला ताबडतोब रुग्णालयात दाखल करण्यात आले, परंतु उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाला होता. या घटनेने संपूर्ण परिसरात एकच शोककळा पसरली.

मातीची विहीर, चौथी घटना

ही विहीर मातीची होती. केवळ वरचा भाग सिमेंटचा होता व त्यावर लोखंडी जाळी बसविण्यात आली होती. भूस्खलनामुळे विहीर जमिनीत दबली गेली. अतिवृष्टी झाल्यानंतर गोधनी परिसरात असे अनेक प्रकार घडतात. या पावसाळ्यातील ही चौथी घटना असून यापूर्वीच्या घटनांमध्ये कोणतीही जीवितहानी झाली नाही, असे स्थानिक नागरिकांचे म्हणणे आहे.

मालकाने घर सोडण्यास सांगितले होते

घरमालक राजेश कुंभारे यांनी तीन ते चार दिवसांपूर्वी सुधीर यांना घर रिकामे करण्यास सांगितले होते. तेव्हापासून सुधीर हे दुसऱ्या घराच्या शोधात होते. आज घटना घडण्यापूर्वीही कुंभारे हे त्यांच्याकडे येऊन गेले व त्यांनी पुन्हा विनंती केली. त्यानंतर काही वेळाने हा अपघात झाला. या घटनेने संपूर्ण परिसरात एकच शोककळा पसरली.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 1, 2017 2:25 am

Web Title: two year old boy dies due to landslide
Next Stories
1 तानाजी वनवेच काँग्रेस गटनेते, विरोधी पक्षनेतेपदी निवड योग्य
2 रेल्वे अपघातास मनुष्यबळाची कमतरता जबाबदार
3 रस्ते नाहीच, फक्त खड्डेच खड्डे
Just Now!
X