अ‍ॅड. उज्ज्वल निकम यांची ग्वाही; जनमंचच्या पुरस्कारांचे वितरण

जनमंच या संस्थेने १० वर्षांपूर्वी  दक्ष नागरिक म्हणून गौरव केला होता. त्यांचे काम आजही अव्याहत सुरू आहे. त्यांचा आदर्श इतर संस्थांनीही घ्यायला हवा. जनमंचसाठी तर मी ‘फुकट राजदूत’ बनायला तयार आहे, अशी ग्वाही अ‍ॅड. उज्ज्वल निकम यांनी दिली.

वंचितांच्या वेदनेला फुंकर घालून त्यांचे भवितव्य उज्ज्वल करणारे विद्यार्थी सहायक समितीचे संस्थापक मधुकर उपलेंचवार आणि गैरप्रकारांच्या विरोधात सतत दोन हात करून शासनाची संपत्ती वाढवणारे लोकाभिमुख उपजिल्हाधिकारी अजय लहाने यांचा जनमंचच्यावतीने जाहीर सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून निकम बोलत होते.

साई सभागृहात पार पडलेल्या या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जनमंचचे अध्यक्ष प्रा. शरद पटील होते. उपलेंचवार यांना ‘जनगौरव’ पुरस्काराने तर लहाने यांना ‘जनसेवक’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. शाल, पुष्पगुच्छ, मानपत्र आणि प्रत्येकी २१ हजार रुपयांचा धनादेश असे पुरस्काराचे स्वरूप होते.

अजय लहाने यांच्या दिलखुलास भाषणातून मनोरंजानाबरोबरच श्रोत्यांचे उद्बोधन झाले. ते म्हणाले, शासनाचा पैसा चुकीच्या पद्धतीने खर्च होत असेल तर ते थांबवणे म्हणजे ते शासनाचे उत्पन्नच होय. वरिष्ठांनी प्रत्येक गोष्टीत लक्ष घातले नाही तर हाताखालचे लोक काय करतील हे सांगता येत नाही. केवळ सज्जन काही कामाचे नसून सज्जन शक्ती हवी आहे. एसी आणि इतर आरामाच्या गोष्टीशिवाय गांजा, आफूही मंदिरातील काही उत्तर भारतीय पूजाऱ्यांकडे मिळाल्या. धर्माचे हे रूप लोकांना मान्य नसते, याकडे त्यांनी लक्ष वेधले. उपलेंचवार म्हणाले, माझे विद्यार्थी कार्यक्रमात सहपरिवार बसल्याचा विशेष आनंद आहे. माझ्या विद्यार्थ्यांशिवाय माझ्या जीवनाला अर्थ नाही. शिक्षक आणि विद्यार्थ्यांमध्ये आत्मियता, जिव्हाळा आणि आपुलकी असायला हवी. शरद पाटील म्हणाले, आजचे दोन्ही सत्कारमूर्ती सज्जन शक्तीचे प्रतीक असून त्यांचा सत्कार हा प्रत्येक चांगले काम करणाऱ्या माणसाचा सत्कार आहे. प्रास्ताविक जनमंचचे उपाध्यक्ष प्रमोद पांडे यांनी तर संचालन बाळ कुळकर्णी यांनी केले. अमिताभ पावडे, अमृत लोणारे, गणेश खर्चे, रमेश बोरकुटे, श्रीकांत दोड, दामोदर तिवाडे आणि नरेश क्षीरसागर यांचे यावेळी सहकार्य लाभले.

समाजमाध्यमांमुळे पोलिसांच्या त्रासात भर

समाजमाध्यमांमुळे पोलीस यंत्रणेच्या त्रासात भर पडली असून कायदा व सुव्यवस्था राखण्यात त्यांची बरीच शक्ती खर्ची पडते. अजमल कसाबच्या खटल्याचा निकाल लागल्यानंतरही इस्लामाबादचे अटर्नी जनरल यांनी पुरावा मागितला तेव्हा अमेरिकेत असलेला अतिरेकी डेव्हिड हेडलीचा पुरावा त्यांना दिला. भारतात पाकिस्तानकडून दहशतवादी भारतात येतात आणि त्यांच्याकडे दहशतवादी पोसलेही जातात, याकडेही अ‍ॅड. निकम यांनी आपल्या भाषणात लक्ष वेधले.