उमा भारतींनी सुनावले; सरकारचे समर्थन

बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांचा राजकीय उदय संघामुळे झाला असून, त्यांना वेळोवेळी संघाने मदत केली आहे. भारत जर संघमुक्त झाला, तर नितीशकुमारांसारखे नेते कुठेच दिसणार नाहीत, अशी टीका भाजपच्या ज्येष्ठ नेत्या आणि केंद्रीय मंत्री उमा भारती यांनी केली. नितीशकुमारांनी नागपुरात येऊन संघाला वंदन केले पाहिजे, असेही त्यांनी येथे स्पष्ट केले.

आमचा राजकारणाशी काही संबंध नसल्याचे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने अनेकदा सांगूनही नितीशकुमार संघावर टीका करीत असतात. खरे तर, संघानेच नितीशकुमार यांना मुख्यमंत्री बनवले, असा खुलासाही त्यांनी केली. भाजपविरोधात सर्व राजकीय पक्ष एकत्र आले तरी पक्षाला काही फरक पडणार नाही.  विकासाच्या धोरणातून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली काम सुरू आहे. टीका करणे ही विरोधकांची सवय असल्याचा आरोपही उमा भारती यांनी केला.

लातूरसह राज्यात विविध भागांत दुष्काळग्रस्त परिस्थिती निर्माण झाली असून त्यास काँग्रेस आणि राष्ट्रवादी जबाबदार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली राबविण्यात येत असलेल्या जलसंधारण योजनेमुळे शेतकऱ्यांना मोठय़ा प्रमाणात दिलासा मिळाला आहे.

राज्यातील भीषण परिस्थितीच्या वास्तवाची केंद्र सरकारने दखल घेतली असून मदत केली जात आहे. दुष्काळाच्या प्रश्नावर राजकारण न करता राज्यातील भीषण परिस्थिती कशी सुधरवता येईल त्या दृष्टीने प्रयत्न झाले पाहिजेत, असे उमा भारती यांनी सांगितले.